लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा मारहाणीत मृत्यू; मृतदेह रिक्षातून डम्पिंग स्पॉटवर फेकला, पुण्यातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2025 13:12 IST2025-11-19T13:12:08+5:302025-11-19T13:12:30+5:30
आरोपीसोबत किरकोळ कारणावरून भांडण झाल्यावर त्याने आणि त्याच्या वडिलांनी मिळून महिलेला मारहाण केली

लिव्ह-इनमध्ये राहणाऱ्या महिलेचा मारहाणीत मृत्यू; मृतदेह रिक्षातून डम्पिंग स्पॉटवर फेकला, पुण्यातील धक्कादायक घटना
पुणे : येरवडा परिसरात राहणाऱ्या सुवर्णा रहा या महिलेचा किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणी आरोपी रवी साबळे आणि त्याचे वडील रमेश साबळे या दोघांना येरवडापोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या महिलेचा मृतदेह मंगळवारी (दि. १८) सकाळी लोहगाव परिसरात सापडला होता. यानंतर, हा गुन्हा उघडकीस आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुवर्णा रहा आणि आरोपी रवी साबळे हे लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत होते. १४ नोव्हेंबर रोजी किरकोळ घरगुती वादातून त्यांच्या दोघांमध्ये भांडण झाले. या वादाच्या दरम्यान झालेल्या मारहाणीमुळे सुवर्णा यांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती तपासात समोर आली आहे. मृत्यूचे कारण ब्लंट फोर्स ट्रॉमा असे नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर मृतदेह लपवण्याच्या उद्देशाने १४ ते १५ नोव्हेंबरच्या दरम्यान मध्यरात्री २ ते ३ वाजण्याच्या सुमारास आरोपींनी रिक्षामध्ये मृतदेह टाकून तो परिसरातील डम्पिंग स्पॉटवर फेकून दिला. डम्पिंग स्पॉटवरील सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाद्वारे पोलिसांनी मृत महिला व दोन्ही आरोपींची ओळख पटवली. त्यानंतर, दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. या प्रकरणी येरवडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांनी दिली.