पुणे नाशिक महामार्गावर अपघातात महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी रुग्णवाहिका अडवली, उड्डाणपुलाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2025 15:43 IST2025-06-07T15:42:27+5:302025-06-07T15:43:08+5:30

पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे चौकात यापूर्वी अनेक अपघात झाले असून येथे छोटा उड्डाणपूल करावा अशी मागणी अनेक वर्षापासून ग्रामस्थांची आहे

Woman dies in accident on Pune Nashik highway Angry villagers block ambulance demand flyover | पुणे नाशिक महामार्गावर अपघातात महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी रुग्णवाहिका अडवली, उड्डाणपुलाची मागणी

पुणे नाशिक महामार्गावर अपघातात महिलेचा मृत्यू; संतप्त ग्रामस्थांनी रुग्णवाहिका अडवली, उड्डाणपुलाची मागणी

मंचर: एकलहरे गावच्या हद्दीत अपघातामध्ये महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या नागरिकांनी पुणे नाशिक महामार्गावर सकाळी मृतदेह घेऊन जाणाऱ्या रुग्णवाहिकेसह रास्ता रोको केला. परिसरातील चार ते पाच गावतील ग्रामस्थ एकवटले होते. त्यांनी महामार्ग अधिकाऱ्यांना धारेवर धरून सदर जागी पूल करावा तसेच ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. पोलिसांनी मध्यस्थी करत आंदोलकांना शांत केले. त्यानंतर लोकप्रतिनिधी समवेत बैठक घेण्याचे आश्वासन  मिळाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे हद्दीत रात्री बसने धडक दिल्याने दुचाकीवरील महिला ठार झाली होती. या भागात वारंवार होणाऱ्या अपघातामुळे परिसरातील नागरिक संतप्त झाले आहेत. पुणे नाशिक महामार्गावर एकलहरे चौकात यापूर्वी अनेक अपघात झाले आहेत. येथे छोटा उड्डाणपूल करावा अशी मागणी अनेक वर्षापासून ग्रामस्थांची आहे. मात्र त्याला अधिकाऱ्यांनी दाद दिली नव्हती. रात्री झालेल्या अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिक संतप्त झाले. सकाळी 11 वाजता कळंब ,साकोरे, एकलहरे ,महाळुंगे पडवळ, विठ्ठलवाडी, टाकेवाडी येथील ग्रामस्थांनी पुणे नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. सुमारे 40 ते 50 नागरिक सहभागी झाले होते. वाहनांच्या लांबवर रांगा लागल्या. यावेळी रात्री अपघातात मरण पावलेल्या रूपाली प्रणाल पडवळ यांचा मृतदेह घेऊन जाणारी रुग्णवाहिका आली. संतप्त नातेवाईकांनी रुग्णवाहिका सुद्धा आंदोलनाच्या ठिकाणी उभी केली. यादरम्यान राष्ट्रीय महामार्गा प्राधिकरणाचे अधिकारी तेथे आले त्यांनी आंदोलनकर्त्यांशी चर्चा सुरू केली. मात्र त्यांच्या भावना तीव्र असल्याने बाचाबाची झाली. येथे वाहने वेगाने येतात गतिरोधक सुद्धा नाही अनेक निष्पाप लोकांना जीव गमवावा लागला आहे. तातडीने छोटासा उड्डाणपूल करावा, ठेकेदारावर गुन्हा दाखल करा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. त्यावेळी पूल मंजूर करण्याचा अधिकार मला नाही मात्र तातडीने गतिरोधक टाकू व रस्त्यात अडथळा ठरणारी झाडे काढून टाकण्याचे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले. तरीही आंदोलन  कर्त्यांचे समाधान झाले नाही. शेवटी पोलिसांनी हस्तक्षेप केला. 

येत्या 18 तारखेला महामार्गाचे वरिष्ठ अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांच्या समवेत एकलहरे येथे बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे आश्वासन राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण मंचरचे उप अभियंता अरुण चौधरी यांनी दिले. दहा दिवसात मागण्या मान्य झाल्या नाही तर पुन्हा आंदोलन करणार आहोत. यावेळी कुणाचेच ऐकले जाणार नाही. असे हुतात्मा बाबू गेनू युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबाजी चासकर यांनी सांगितले. यावेळी माजी सरपंच संतोष डोके, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे, संदीप शिंदे, दीपक चिखले, मिलिंद शिंदे, रीना डोके, प्रदीप शिंदे, यादव चासकर, दीपक भालेराव, हेमंत पडवळ, पोलीस पाटील सुमन फलके ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान महामार्गालगतची अडथळा ठरणारी झाडे काढण्यास सुरुवात करण्यात आली.

Web Title: Woman dies in accident on Pune Nashik highway Angry villagers block ambulance demand flyover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.