बाप्पांचे आगमन पावसांत होणार? राज्यात पुढील ४ दिवस मुसळधारचा इशारा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 19:12 IST2021-09-05T19:12:35+5:302021-09-05T19:12:48+5:30

कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात ऑरेंट अलर्ट

Will Bappa's arrival be in the rain? Warning of torrential downpour in the next 4 days in the state ... | बाप्पांचे आगमन पावसांत होणार? राज्यात पुढील ४ दिवस मुसळधारचा इशारा...

बाप्पांचे आगमन पावसांत होणार? राज्यात पुढील ४ दिवस मुसळधारचा इशारा...

ठळक मुद्देपुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात ७ ते ९ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा

पुणे : मराठवाडा व लगतच्या भागावर चक्रीय चक्रवात तयार झाला असून तसेच बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने मध्य भारतासह दक्षिणेतील बहुतांश राज्ये, पश्चिम किनारपट्टीवर सध्या जोरदार पाऊस सुरु झाला आहे. पुढील ४ दिवस कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात जोरदार पावसाचा शक्यता आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांसह पुणे, नाशिक, कोल्हापूर, सातारा, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, अकोला जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

७ व ८ सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे लाडक्या बाप्पाचे आगमन पावसातच होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. गेल्या २४ तासात कोकण, गोवा व मराठवाड्यात काही ठिकाणी मुसळधार तर तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस झाला.

कोकणातील काणकोन १९०, देवगड ९०, चिपळूण, कल्याण, मालवण ८०, श्रीवर्धन ७०, कणकवली, वैभववाडी ६०, खालापूर, लांजा, म्हसाळा, पेडणे, पोलादपूर, रत्नागिरी ५० मिमी पावसाची नोंद झाली होती. इतरत्र मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला.

मध्य महाराष्ट्रातील जळगाव १००, माढा ८०, बोदवड ७०, भुसावळ गगनबावडा, जामखेड, यावल ६०, बार्शी, भडगाव, चाळीसगाव, गिरणा धरण, जामनेर, कर्जत, करमाळा, महाबळेश्वर, पाथर्डी ५० मिमी पाऊस झाला.

मराठवाड्यातील शिरुर कासार १५०, अंबड, घनसावंगी १२०, देवणी, रेणापूर, सोयगाव ११०, बीड, भूम १००, औसा, चाकूर ८०, आंबेजोगाई, औंढा नागनाथ, कळमनुरी, पैठण ६०, औरंगाबाद, बदलापूर, हिंगोली, जाफराबाद, जळकोट, कैज, कळंब, खुलताबाद, लातूर, लोहारा, सेनगाव, शिरुर अनंतपाल, तुळजापूर ५० मिमी पाऊस झाला. विदर्भातील मंगलूरपीर, मनोरा, मूलचेरा, रिसोड, वाशिम ५० मिमी पावसाची नोंद झाली होती.

घाटमाथ्यावरील सर्वच ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात बहुतेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. रायगड जिल्ह्यात ७ सप्टेंबर रोजी तर पालघर व नाशिक जिल्ह्यात ८ सप्टेंबर रोजी तुरळक ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांमध्ये ७ व ८ सप्टेंबरला ऑरेंट अलर्ट दिला आहे.

पुणे, कोल्हापूर, सातारा, नाशिक जिल्ह्यातील घाट परिसरात ७ ते ९ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर जिल्ह्यात ६ सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. औरंगाबाद व अकोला जिल्ह्यात ७ सप्टेंबरला ऑरेंट अलर्ट देण्यात आला आहे.

Web Title: Will Bappa's arrival be in the rain? Warning of torrential downpour in the next 4 days in the state ...