पत्नीला ब्रेन ट्युमर; कोंढव्यातील चाळीत दाम्पत्य मृतावस्थेत सापडले, कारण अद्याप अस्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 12:18 IST2026-01-12T12:17:49+5:302026-01-12T12:18:33+5:30
मुलगा खासगी कंपनी काम करत असून तो घरी आल्यावर आई वडील बेशुद्धावस्थेत आढळून आले होते

पत्नीला ब्रेन ट्युमर; कोंढव्यातील चाळीत दाम्पत्य मृतावस्थेत सापडले, कारण अद्याप अस्पष्ट
पुणे: कोंढव्यातील एका चाळीत दाम्पत्य मृतावस्थेत सापडल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली असून, शवविच्छेदन अहवालानंतर दाम्पत्याच्या मृत्यूमागचे कारण स्पष्ट होईल, अशी माहिती पोलिसांनी दिली.
प्रकाश मुंडे (५२) आणि ज्ञानेश्वरी मुंडे (४८) अशी मृतावस्थेत सापडलेल्यांची नावे आहेत. मुंडे कुटुंबीय कोंढव्यातील श्रद्धानगर भागात असलेल्या एका चाळीत राहायला होते. मुंडे दाम्पत्याचा मुलगा गणेश (२३) हा एका खासगी कंपनीत नोकरी करतो. तो शुक्रवारी (दि. ९) सकाळी तो रात्रपाळीवरून घरी आला. तेव्हा घराचा दरवाजा बंद होता. गणेशने दरवाजा वाजवला. मात्र, प्रतिसाद देण्यात आला नाही. गणेशने शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली. शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा वडील प्रकाश आणि ज्ञानेश्वरी हे बेशुद्धावस्थेत पडल्याचे आढळून आले. मुंडे दाम्पत्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.
‘ज्ञानेश्वरी यांना ब्रेन ट्यूमर होता. वर्षभरापासून त्या आजारी होत्या. प्रकाश हे चालक म्हणून काम करायचे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. दोघांचे शवविच्छेदन करण्यात आले आहे. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूमागचे कारण समजू शकेल. याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे’, अशी माहिती येवलेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमर काळंगे यांनी दिली.