सिमेंट मिक्सर मागे घेताना थेट चाकाखाली सापडला; चालकाच्या निष्काळजीपणामुळे मजुराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 16:32 IST2026-01-12T16:32:15+5:302026-01-12T16:32:40+5:30
मिक्सर चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली असून अपघातानंतर मिक्सरचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला

सिमेंट मिक्सर मागे घेताना थेट चाकाखाली सापडला; चालकाच्या निष्काळजीपणामुळे मजुराचा मृत्यू
पुणे: सिमेंट मिक्सरच्या चाकाखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू झाल्याची घटना पाषाण- बाणेर लिंक रस्त्यावरील एका नियोजित गृहप्रकल्पाच्या आवारात घडली. अनिल उमाशंकर यादव (२५, सध्या रा. लव्हिन्स अटायना टाॅवर, लेबर कॅम्प, पाषाण-बाणेर लिंक रस्ता, मूळ रा. उत्तर प्रदेश) असे मृत्युमुखी पडलेल्या बांधकाम मजुराचे नाव आहे. याप्रकरणी सिमेंट मिक्सर चालक दीपककुमार उपेंद्र यादव (२२, सध्या रा. एचपी पेट्रोल पंपाजवळ, चांदे, ता. मुळशी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत महंमद सद्दाम अन्वर (२८, रा. एचपी पेट्रोल पंपाजवळ, चांदे) याने बाणेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाषाण-बाणेर लिंक रस्त्यावर एका गृहप्रकल्पाचे काम सुरू आहे. दि. ९ जानेवारी रोजी दुपारी पावणेतीनच्या सुमारास सिमेंट मिक्सर गृहप्रकल्पाच्या आवारात आला होता. त्यावेळी बांधकाम मजूर अनिल यादव तेथे काम करत होता. सिमेंट मिक्सर मागे नेत असताना पाठीमागे थांबलेला अनिल चाकाखाली सापडला. अपघातानंतर मिक्सरचालक घटनास्थळी न थांबता पसार झाला. मिक्सर चालकाच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडली. याप्रकरणी मिक्सर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक बालाजी सानप करत आहेत.