Navale Bridge Accident: काय पाप केलं होतं या लोकांनी? एका क्षणात सारं संपलं! नातेवाईकांचा आक्रोश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 09:59 IST2025-11-15T09:58:08+5:302025-11-15T09:59:01+5:30
नियतीने एकत्र गाठलेल्या या तिघांनाही अखेरच्या प्रवासातही एकत्रच निरोप मिळाला

Navale Bridge Accident: काय पाप केलं होतं या लोकांनी? एका क्षणात सारं संपलं! नातेवाईकांचा आक्रोश
धायरी: शहराला हादरवून सोडणाऱ्या नवले पूल भीषण अपघातातील तीन दुर्दैवी मृतांवर शुक्रवारी (दि. १४) नवी पेठ येथील वैकुंठ स्मशानभूमीत एकाच वेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. वडगाव खुर्द येथील स्वाती संतोष नवलकर (वय ३७, रा. विश्वास पॅलेस, धायरी फाटा), शांता दत्तात्रय दाभाडे (वय ५४) आणि त्यांचे पती दत्तात्रय चंद्रकांत दाभाडे (वय ५८, दोघे रा. सत्यसाई अपार्टमेंट, धायरी फाटा) या तिघांच्या पार्थिवावर सकाळी साडेअकरा वाजता अंत्यविधी पार पडला.
एकाच दुर्घटनेत निष्पाप जीव गेल्याने धायरी फाटा परिसरावर शोककळा पसरली आहे. शुक्रवारी वैकुंठमध्ये हे हृदयद्रावक चित्र पाहायला मिळाले. एकाच कुटुंबातील आणि जवळच्या परिसरातील तिघांचे मृतदेह जेव्हा वेगवेगळ्या विद्युत वाहिन्यांवर एकाच वेळी ठेवण्यात आले, तेव्हा उपस्थित नातेवाइकांच्या अश्रूंचा बांध फुटला.
‘‘काय पाप केलं होतं या लोकांनी? एका क्षणात सारं संपलं!’’ असा आर्त टाहो फोडत नातेवाईक आक्रोश करत होते. नियतीने एकत्र गाठलेल्या या तिघांनाही अखेरच्या प्रवासातही एकत्रच निरोप मिळाला. अपघाताच्या धक्क्यातून सावरत अंत्यसंस्कारासाठी आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यांत पाणी दिसत होते. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हृदयद्रावक घटनेने दिलेले दुःख स्पष्टपणे जाणवत होते. हा अत्यंत हृदय पिळवटून टाकणारा क्षण होता, ज्याने उपस्थित प्रत्येकालाच स्तब्ध केले.