ओडिशाच्या तरुणावर धारदार शस्त्राने गंभीर वार करून खून; कोरेगाव भीमा येथील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 15:10 IST2026-02-12T15:09:40+5:302026-02-12T15:10:27+5:30
कामाच्या निमित्ताने कोरेगाव भीमा येथे तो वास्तव्यास होता, त्याचा खून जुन्या वादातून झाला की अन्य काही कारणातून, याचा तपास सध्या पोलीस करत आहेत

ओडिशाच्या तरुणावर धारदार शस्त्राने गंभीर वार करून खून; कोरेगाव भीमा येथील घटना
कोरेगाव भीमा : पुणे-नगर महामार्गावरील कोरेगाव भीमा (ता. शिरूर) येथील ‘आपलं घर हॉटेल’च्या मागे एका परप्रांतीय तरुणाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आली आहे. शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुकेन महातो (रा. ओडिशा) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून शिक्रापूर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
कोरेगाव भीमा येथील पुणे-नगर महामार्गालगत असलेल्या ‘आपलं घर हॉटेल’च्या मागे एका तरुणाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, सुकेन महातो याच्यावर धारदार शस्त्राने गंभीर वार करून त्याची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले. घटनेचे गांभीर्य ओळखून उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, शिक्रापूर पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक, सहायक पोलिस निरीक्षक राहुल देशमुख यांच्यासह पथकाने घटनास्थळी भेट दिली, तसेच शिरूर येथील फॉरेन्सिक विभागाला पाचारण करण्यात आले असून, घटनास्थळावरून महत्त्वाचे पुरावे गोळा करण्यात आले आहेत. आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची चार पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिस प्रशासन आरोपीचा कसून शोध घेत असल्याची माहिती पोलिस निरीक्षक दीपरतन गायकवाड यांनी दिली. यावेळी हवालदार नवनाथ नाईकरे, गणेश कुदळे, श्रावण गुपचे, अमोल दांडगे, विकास पाटील आणि अमोल नलगे यांचे पथक तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांच्या मदतीने आरोपींचा माग काढत आहे. मयत सुकेन महातो हा मूळचा ओडिशाचा रहिवासी असून तो कामाच्या निमित्ताने या परिसरात वास्तव्यास होता. त्याचा खून जुन्या वादातून झाला की अन्य काही कारणातून, याचा तपास सध्या पोलिस करत आहेत. आरोपींना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेची मदतही घेतली जात असल्याचे समजते.