'आपण दोघे मिळून स्पर्धेचे नंबर ठरवू', शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, दौंडमधील धक्कादायक प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 18:52 IST2025-12-19T18:51:06+5:302025-12-19T18:52:10+5:30
विद्यार्थिनी शाळेतील विज्ञान प्रदर्शनाच्या तयारीसाठी वर्गात काम करत असताना शिक्षकाने तिच्या शेजारी बाकावर बसून विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

'आपण दोघे मिळून स्पर्धेचे नंबर ठरवू', शिक्षकाकडून अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, दौंडमधील धक्कादायक प्रकार
केडगाव : दौंड तालुक्यातील पारगाव येथे अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये एका शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यवत पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा बालकांचे लैंगिक अत्याचार संरक्षण अधिनियम कलम ८ व १३ तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) अधिनियम अंतर्गत हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
ही घटना दिनांक १८ डिसेंबर रोजी दुपारी सुमारे १ वाजण्याच्या सुमारास मौजे पारगाव (ता. दौंड, जि. पुणे) येथे घडल्याचे फिर्यादीत नमूद आहे. १३ वर्षे ८ महिने वयाच्या अल्पवयीन विद्यार्थिनी व पालकाने याबाबत तक्रार दिली आहे. अल्पवयीन विद्यार्थिनी व इतर ५ ते ६ विद्यार्थिनी शाळेतील विज्ञान प्रदर्शनाच्या तयारीसाठी वर्गात काम करत असताना, शाळेतील शिक्षक आरोपी प्रशांतकुमार हरिचंद्र गावडे हे वर्गात आले. त्यांनी फिर्यादीचा उजवा हात हातात धरून “आपण दोघे मिळून स्पर्धेचे नंबर ठरवू” असे म्हणत तिच्या शेजारी बाकावर बसून विनयभंग केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार वलेकर यांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी बापूराव दडस (दौंड उपविभाग) हे करीत आहेत.