पुणे: पावसाने पाठ फिरवल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून पुणे विभागात सध्या ९१ टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.विभागातील १ लाख ७६ हजार १०३ नागरिक दुष्काळाने बाधित झाले असून जिल्हा प्रशासनाकडून १७ तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.दुष्काळाची तीव्रता वाढत जाणार असल्याने लवकरच पुणे विभाग टँकरची शंभरी गाठेल,अशी शक्यता विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिका-यांकडून व्यक्त केली जात आहे.सप्टेबर महिन्यापासून पावसाने दडी मारली. त्यानंतर सुमारे महिन्याभरापूर्वी काही ठिकाणी अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या.त्यामुळे पुणे विभागातील सातारा,सांगली,पुणे व सोलापूर या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी टंचाई निर्माण झाली आहे.विभागात ४ डिसेंबर रोजी ७४ टँकर सुरू होते तर ५ डिसेंबर रोजी टँकरची संख्या ८५ वर गेली.गुरूवारी (दि.6) विभागात ९१ टँकरने पाणी पुरवठा सुरू करण्यात आला.सध्या ९३ गावे आणि ६३८ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.पुणे विभागातील सातारा जिल्ह्यात माणमध्ये ३१,खटावमध्ये ५ तर कोरेगावमध्ये १ आणि फलटण येथे २ टँकर सुरू आहेत.तर पुणे जिल्ह्यातील बारामतीमध्ये १० आणि शिरूरमध्ये ८ टँकर सुरू असून दोन दिवसांपूर्वी दौंड तालुक्यात ७ टँकर सुरू करण्यात आले आहेत. तसेच पुरंदर व जुन्नरमध्ये प्रत्येकी २ आणि आंबेगावमध्ये १ असे एकूण ३० टँकर सुरू आहेत.त्याचप्रमाणे सांगलीत खाणापूर येथे ३ आटपाडीत ७ जतमध्ये ४,कवठे महांकाळ येथे २ आणि तासगाव येथे १ टँकर सुरू आहे.तसेच सोलापूरात माढा येथे ३ आणि करमाळ्यात २ टँकर चालू आहेत.
पुणे विभाग गाठणार टँकरची शंभरी, दुष्काळाच्या झळा वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2018 19:07 IST
विभागातील १ लाख ७६ हजार १०३ नागरिक दुष्काळाने बाधित झाले असून जिल्हा प्रशासनाकडून १७ तालुक्यात टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे.
पुणे विभाग गाठणार टँकरची शंभरी, दुष्काळाच्या झळा वाढल्या
ठळक मुद्देदुष्काळाच्या झळा वाढल्या;साता-यात ३९,पुण्यात ३०, सांगलीत १७ टँकर सध्या ९३ गावे आणि ६३८ वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा