Walmik karad : धनंजय मुंडे यांची जिल्ह्यात ताकद वाढल्यानेच विषयाला जाणीवपूर्वक जातीय वळण देण्याचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 1, 2025 10:28 IST2025-01-01T10:27:24+5:302025-01-01T10:28:08+5:30
वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे समर्थकांचा आरोप

Walmik karad : धनंजय मुंडे यांची जिल्ह्यात ताकद वाढल्यानेच विषयाला जाणीवपूर्वक जातीय वळण देण्याचा प्रयत्न
पुणे :वाल्मीक कराडवर अनेक गुन्हे दाखल आहेत असे सांगितले जात आहे. जर त्यांच्यावर एवढे गुन्हे दाखल आहेत, तर मग राष्ट्रवादी काँग्रेस एकसंघ असताना या गोष्टीचा उठाव करायला हवा होता. पण आज धनंजय मुंडे यांची जिल्ह्यात वाढलेली ताकद पाहता जिल्ह्यातील आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी या विषयाला जाणीवपूर्वक राजकीय आणि जातीय वळण देण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोप वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांच्या समर्थकांनी केला आहे.
वाल्मीक कराड हा सीआयडी मुख्यालयात मंगळवारी पोलिसांसमोर शरण आला. कराड याने शरणागती पत्करल्याचे वृत्त पसरताच वाल्मीक कराडच्या समर्थकांनी मुख्यालयाबाहेर धाव घेतली. मात्र त्यांना मुख्यालयात प्रवेश करण्यास अटकाव करण्यात आला. आम्ही वाल्मीक कराड यांचे समर्थक आहोत हे नाकारत नाही, मात्र त्यांच्यावरील आरोप चुकीचे आणि बिनबुडाचे आहेत. वाल्मीक कराड हा देवमाणूस आहे. माझ्या मुलाला एमबीबीएस करण्यासाठी अण्णा यांनी मदत केली असल्याचे एका समर्थकाने सांगितले.
वाल्मीक कराड याने अनेक जणांचे खून केले असल्याचा त्यांच्यावर आरोप केला जात आहे असे पत्रकारांनी विचारले असता हे अत्यंत खोटे विधान आहे. माझ्या भावाचा देखील खून झाला होता. त्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उपाध्यक्ष बबन गिते याचा हात होता, असा आरोप त्यांनी केला. सत्र न्यायालयात आमच्या विरोधात निकाल लागला. त्यामुळे मी उच्च न्यायालयात अपिल दाखल केले आहे, असेही त्याने सांगितले. खरे तर सुरेश धस हाच आका आहे आणि त्यानेच पूर्वी भुत्या गायकवाडचा निर्घृण खून केला आहे. तो गरीब होता म्हणून हे प्रकरण कुणी उचलून धरले नसल्याचा आरोपही समर्थकाने धस यांच्यावर केला आहे.