'वंदे मातरम्' च्या उत्सवाचे देशभरात कार्यक्रम; काँग्रेस, शरद पवार गट, मनसे कुठे आहेत? आशिष शेलारांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 20:52 IST2025-11-07T20:50:50+5:302025-11-07T20:52:30+5:30
संविधानाच्या विषयावर गैरसमज पसरवून मतदारांचा फायदा घ्यायचा पण राष्ट्रगानच्या कार्यक्रमात ना सहभागी व्हायचे ना आयोजन करायचे? ही दुतोंडी भूमिका काँग्रेसवाले, शरद पवार गटाची का?

'वंदे मातरम्' च्या उत्सवाचे देशभरात कार्यक्रम; काँग्रेस, शरद पवार गट, मनसे कुठे आहेत? आशिष शेलारांचा सवाल
पुणे : 'वंदे मातरम' या गीताला १५० वर्षे पूर्ण झाली आहेत. संविधानाने या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा दिला आहे. या गीताच्या उत्सवाचे देशासह राज्यभरात कार्यक्रम होत आहेत. मग, संविधानाच्या विषयावर गैरसमज पसरवणारे काँग्रेसवाले, शरद पवार गट आणि मनसेवाले आहेत कुठे? असा सवाल राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
पुण्यात एका कार्यक्रमानिमित्त आले असता शेलार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. वंदे मातरम् च्या गीताच्या कार्यक्रमात काँग्रेसवाले, शरद पवार गट आणि मनसेवाले सहभागी होताना दिसत नाहीत किंवा स्वतः कार्यक्रम करताना दिसत नाहीत. संविधानाच्या विषयावर गैरसमज पसरवून मतदारांचा फायदा घ्यायचा पण राष्ट्रगानच्या कार्यक्रमात ना सहभागी व्हायचे ना आयोजन करायचे? ही दुतोंडी भूमिका काँग्रेसवाले, शरद पवार गटाची का? असेही ते म्हणाले.
मुंढवा येथील जमीन घोटाळा प्रकरणात पार्थ पवार यांचे नाव घेतले जात आहे, सध्या या विषयाने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अशा प्रकरणात अधिकारी निलंबित होतात, राजकीय दबावामुळे अधिका-यांचा बळी जातो का? यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मित्र पक्षांना टार्गेट केले जात आहे का? याविषयी शेलार यांना माध्यमांनी विचारले असता, कुठलीही अनियमितता राज्यात खपवून घेतली जाणार नाही, त्यावर योग्य ती भूमिका आणि कारवाई केली जाईल असे मुख्यमंत्र्यांनी नुकतेच घोषित केले आहे. या प्रकरणात चौकशी समिती नेमण्यात आली आहे. चौकशीची प्रक्रिया सुरु आहे. चौकशी समितीमधून सत्य समोर येईल. अजित पवारांना टार्गेट करण्याचा प्रश्न नाही.
शिवसेना (उबाठा गट) नेते उद्धव ठाकरे मराठवाड्याच्या दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान हे सरकार कंत्राटदारांचे आहे. अजित पवारांच्या पोरांसाठी नियम बदलले जातात, पण शेतकऱ्यांना द्यायला पैसे नाहीत, अशी टीका ठाकरे करीत आहेत, त्यावर भाष्य करताना शेलार म्हणाले, ठाकरे यांची टीका निराधार आहे. त्यांच्या टीकेतून राजकीय वास येतोय. त्यांच्या दौऱ्यातून राजकीय लाभ असाच हेतू दिसत आहे. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होत आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.