बनावट चावीचा वापर; सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी आलेल्या रिक्षाची चोरी, शनिवार वाडा परिसरातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2025 11:05 IST2025-09-04T11:04:25+5:302025-09-04T11:05:11+5:30
गणेशोत्सवात चोरट्यांचे प्रमाण वाढल्याने देखावे पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांनी सावधानी बाळगावी

बनावट चावीचा वापर; सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी आलेल्या रिक्षाची चोरी, शनिवार वाडा परिसरातील घटना
पुणे : सहकुटुंब देखावे पाहण्यासाठी आलेल्या एकाची रिक्षा चोरून नेल्याची घटना शनिवार वाडा परिसरात घडली. या प्रकरणी चोरट्यांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका रिक्षाचालकाने विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक कुटुंबीयांसोबत रविवारी (दि. ३१) दुपारी देखावे पाहण्यासाठी आला होते. त्याने शनिवार वाडा परिसरात रिक्षा लावली. चोरट्यांनी बनावट चावीचा वापर करून रिक्षा चोरून नेली. देखावे पाहून रिक्षाचालक तेथे आला. तेव्हा रिक्षा जागेवर नसल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याने पोलिसांकडे तक्रार दिली. चोरीला गेलेल्या रिक्षाची किंमत ७५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिस हवालदार कोकाटे तपास करत आहेत.
एका तरुणाची दुचाकीही चोरली
शनिवार वाडा परिसरात दुचाकी लावून देखावे पाहण्यासाठी गेलेल्या एका तरुणाची दुचाकी चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका तरुणाने फरासखाना पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुण वाकड परिसरात राहायला आहे. शनिवारी (दि. ३०) तरुण मित्रासाेबत देखावे पाहण्यासाठी आला होता. शनिवार वाडा परिसरातील एका हाॅस्पिटलजवळ त्याने दुचाकी लावली. दुचाकी चोरून चोरटे पसार झाले. पोलिस हवालदार मानमाेडे पुढील तपास करत आहेत.