Pune:कर्वे रस्त्यावरील पौड फाट्याजवळील अपघातात मनसे पदाधिकारी अमराळेंच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2024 15:33 IST2024-09-09T15:32:53+5:302024-09-09T15:33:37+5:30
मद्यधुंद टेम्पो चालकाने दारूच्या नशेत ७ ते ८ वाहनांनाही उडवले

Pune:कर्वे रस्त्यावरील पौड फाट्याजवळील अपघातात मनसे पदाधिकारी अमराळेंच्या पत्नीचा दुर्दैवी मृत्यू
पुणे: पुण्यातील कर्वे रस्त्यावरील पौड फाट्याजवळ काल रात्री अपघाताचाही घटना घडली. एका टेम्पो चालकाने दारूच्या नशेत गाडी चालवून अनेक गाडयांना धडक दिल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये मनसेचे पदाधिकारी श्रीकांत अमराळे यांच्या पत्नी गीतांजली यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले आहेत. याप्रकरणी चालक आशिष पवारला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, कोथरुड कर्वे रस्त्यावरून टेम्पो चालक आशिष पवार हा दारुच्या नशेत गाड्यांना धडक देत जात होता. त्याचा टेम्पो पौड फाट्याच्या सिग्नलजवळ आला. त्याठिकाणी मनसेचे पदाधिकारी अमराळे दाम्पत्य उभे होते. चालकाने दारूच्या नशेत त्यांच्या अंगावर टेम्पो घातला. या घटनेत गीतांजली यांच्या अंगावरुन टेम्पो गेल्याने जागीच मृत्यू झाला. तर श्रीकांत अमराळे हे गंभीररित्या जखमी झाले.
कर्वे रस्त्यावरून मद्यधुंद टेम्पो चालक आशिष पवार सात ते आठ जणांना उडवत आला. त्यानंतर टेम्पो चालकाने सावरकर उड्डाण पुलाखाली तीन जणांना उडवले. तर दोन लहान मुलांना उडवले. दारू पिल्याने त्याची अवस्था खूपच वाईट होती. त्याला डोळेही उघडता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या अवस्थेत तो पौड फाटा येथे सावरकर उड्डाण पुलाजवळील सिग्नल तोडत दोन स्कुटींना धडकही दिली. या घटनेनंतर जमावाने टेम्पो चालकाला खाली उतरवत मारहाण केली. हा प्रकार तिथे उपस्थित असलेल्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी पाहिला. त्यांनी आशिष पवारला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलीस याप्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.