प्रदूषणमुक्तीसाठी मोठ्या नद्यांवरच नव्हे, तर त्यांना मिळणाऱ्या नदी-नाल्यांवर प्रक्रिया गरजेची - मुरलीधर मोहोळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2025 16:14 IST2025-08-29T16:14:09+5:302025-08-29T16:14:49+5:30

ग्रामीण व शहरी भागातील गटार व औद्योगिक सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळल्याने पाणी प्रदूषण वाढले आहे

To eliminate pollution, treatment is necessary not only on large rivers, but also on the rivers and streams that feed them - Muralidhar Mohol | प्रदूषणमुक्तीसाठी मोठ्या नद्यांवरच नव्हे, तर त्यांना मिळणाऱ्या नदी-नाल्यांवर प्रक्रिया गरजेची - मुरलीधर मोहोळ

प्रदूषणमुक्तीसाठी मोठ्या नद्यांवरच नव्हे, तर त्यांना मिळणाऱ्या नदी-नाल्यांवर प्रक्रिया गरजेची - मुरलीधर मोहोळ

पुणे : जिल्ह्यातील प्रमुख नद्या प्रदूषणमुक्त करण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पांना गती मिळाली असून, या प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी केवळ मोठ्या नद्यांवरच नव्हे, तर त्यात मिळणाऱ्या छोट्या नदी-नाल्यांच्या पाण्यावर देखील प्रक्रिया करण्याची गरज आहे. त्यासाठी स्वच्छ भारत मिशनमध्ये जिल्हा परिषदेकडून १० नवे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत. यामुळे कचरा व्यवस्थापन, मलनि:स्सारण व स्वच्छता उपक्रमांना चालना मिळून पर्यावरण संतुलन साधण्यास मदत होणार आहे, असल्याची माहिती केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात शुक्रवारी (दि.२९) आयोजित जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) आढावा बैठकीत ते बोलत होते. नगरविकास व सामाजिक न्याय विभागाच्या राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे, आमदार बापूसाहेब पठारे, बाबाजी काळे, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखरसिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील तसेच विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

मोहोळ म्हणाले, “जिल्ह्यात जलप्रदूषणाचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. ग्रामीण व शहरी भागातील गटार व औद्योगिक सांडपाणी थेट नद्यांमध्ये मिसळल्याने पाणी प्रदूषण वाढले आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून प्रकल्प उभारले जात आहेत. परंतु, फक्त प्रमुख नद्यांवरच प्रकल्प उभारून उपयोग होणार नाही, तर उपनद्या, नाले व गटार पाण्यावरही शास्त्रोक्त पद्धतीने प्रक्रिया होणे अत्यावश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व नियोजन प्राधिकरणांनी उत्तम समन्वयासाठी प्रयत्न करावेत.” यासाठी यासाठी लवकरच पुणे महापालिका, पिंपरी चिंचवड महापालिका, पीएमआरडीए व जिल्हा परिषद यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन केले जाणार आहे, असेही ते म्हणाले.

शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी पुणे मेट्रोचा वाटा वाढत असून जुलैमध्ये एक लाख ९२ हजार तर ऑगस्टमध्ये २ लाख १३ हजार प्रवाशांनी लाभ घेतला आहे. टप्पा दोनचे प्रस्ताव वेगवेगळ्या टप्प्यावर आहेत. त्याची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण होताच त्याचे काम सुरु होईल. त्या कामाला अधिक गती देण्याचे निर्देश यावेळी मोहोळ यांनी दिले. पुणे विमानतळाच्या जुन्या टर्मीनलच्या नूतनीकरणाचे काम डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे डुडी यांनी सांगितले. तसेच नव्या टर्मिनलच्या जागेच्या अधिग्रहणाचे काम सुरु करण्यात आले असून मार्किंगचे काम पूर्ण झाल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

Web Title: To eliminate pollution, treatment is necessary not only on large rivers, but also on the rivers and streams that feed them - Muralidhar Mohol

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.