पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू; कोंढवा, पुणे-सातारा रस्ता, हडपसर भागातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 09:29 IST2025-10-14T09:29:32+5:302025-10-14T09:29:49+5:30
पुण्यात वाहनांचे प्रमाण वाढत चालल्याने अपघातही वाढू लागले आहेत, पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून चालावे लागत आहे

पुणे शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू; कोंढवा, पुणे-सातारा रस्ता, हडपसर भागातील घटना
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात एका कार चालकासह तिघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कोंढवा, पुणे-सातारा रस्ता, हडपसर भागात अपघाताच्या घटना घडल्या. कोंढव्यातील एनआयबीएम रस्त्यावर भरधाव रिक्षाने कारला धडक दिल्याने कार चालकाचा मृत्यू झाल्याची घटना ११ ऑक्टोबर रोजी रात्री घडली. प्रसाद प्रल्हाद कुलकर्णी (२६, रा. महेश सोसायटी, बिबवेवाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या कार चालकाचे नाव आहे. याबाबत कुलकर्णी यांच्या मित्राने काेंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रिक्षा चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारचालक प्रसाद कुलकर्णी हे शनिवारी (दि. ११) रात्री साडेअकराच्या सुमारास एनआयबीएम रस्त्याने निघाले होते. त्यावेळी विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने आलेल्या रिक्षाचालकाने कारला धडक दिली. कारचालक कुलकर्णी यांचे नियंत्रण सुटल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. गंभीर जखमी झालेल्या कुलकर्णी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. पोलिस उपनिरीक्षक पंकज खोपडे पुढील तपास करत आहेत.
पुणे-सातारा रस्त्यावर तावरे काॅलनी परिसरात बीआरटी मार्गातून निघालेल्या पादचाऱ्याला भरधाव पीएमपी बसने धडक दिल्याची घटना घडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विकी बसवराज कोलते (३०, रा. डाॅ. बाबासाहेब आंंबेडकरनगर, पुणे-सातारा रस्ता) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. याबाबत पाेलिस कर्मचारी ज्ञानेश्वर शिंदे यांनी पर्वती पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हडपसर-सासवड रस्त्यावरील फुरसुंगी भागात शनिवारी पहाटे सव्वा चारच्या सुमारास भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. गणेश रमेश बोराळे (२४, रा. भेकराईनगर, हडपसर ) असे मृत्युमुखी पडलेल्या पादचारी तरुणाचे नाव आहे. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता पसार झालेल्या वाहनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस कर्मचारी निखिल पवार यांनी फुरसुंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. उपनिरीक्षक विनोद पवार पुढील तपास करत आहेत.