पोस्को व बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी; २ कोटींची खंडणी; पती - पत्नीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2025 17:58 IST2025-11-27T17:57:21+5:302025-11-27T17:58:17+5:30
फिर्यादीकडून दीड कोटी रुपयांचे तीन चेक घेतल्यानंतरही उर्वरित पन्नास लाखांची सातत्याने मागणी केल्याने हा प्रकार उघडकीस आला

पोस्को व बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी; २ कोटींची खंडणी; पती - पत्नीला अटक
ओतूर: पोस्को व बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत तब्बल दोन कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पती-पत्नीस अखेर पोलिसांनी अटक केली आहे. फिर्यादीकडून दीड कोटी रुपयांचे तीन चेक घेतल्यानंतरही उर्वरित पन्नास लाखांची सातत्याने मागणी केल्याने हा प्रकार उघडकीस आला.
दि. १५ मे २०२५ रोजी खामुंडी (ता. जुन्नर) येथील मारूती मनोहर कदम (६१) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार आरोपी विजय हरिदास फलके (४०), पुनम विजय फलके (३४), त्यांची अल्पवयीन मुलगी आणि एक अनोळखी इसम यांनी संगनमत करून फिर्यादीस खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची भीती दाखवत दोन कोटींची खंडणी मागितली. या दबावामुळे फिर्यादीकडून प्रत्येकी ५० लाखांचे तीन चेक आरोपींकडे देण्यात आले होते. तक्रारीनुसार गुन्हा ओतूर पोलीस स्टेशनमध्ये गु.र. नं. १६९/२०२५, बीएनएस कलम ६१(२), ३०८(२), ३०८(३), ३(५) अन्वये दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपी पती-पत्नीने प्रथम जुन्नर सत्र न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. उच्च न्यायालयात तब्बल २० सुनावणीनंतरही दिलासा न मिळाल्याने आरोपी विजय फलके यांनी २४ नोव्हेंबर रोजी ओतूर पोलीस स्टेशनमध्ये आत्मसमर्पण केले. त्याला अटक करून २५ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर करण्यात आले असता, प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी त्याला ७ दिवसांची पोलीस कस्टडी सुनावली. आरोपींनी अशाच प्रकारे इतरत्रही गुन्हे केले आहेत का, याबाबत आणि खंडणी प्रकरणातील सर्व पैलूंवर तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस अधीक्षक संदिपसिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरीक्षक लहु थाटे करीत आहेत.