रेल्वेच्या आरक्षित डब्यात चोरांचा सुळसुळाट; वाढत्या चोरीमुळे प्रवाशांना आर्थिक फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 18:31 IST2025-10-13T18:30:47+5:302025-10-13T18:31:08+5:30
आरपीएफकडे मनुष्यबळ कमी असल्याने पुणे रेल्वे विभागातील अनेक स्थानकांवर आरपीएफचे पोलिसच तैनात नाहीत. यामुळे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे झाले आहे

रेल्वेच्या आरक्षित डब्यात चोरांचा सुळसुळाट; वाढत्या चोरीमुळे प्रवाशांना आर्थिक फटका
पुणे: रेल्वेच्या आरक्षित डब्यातून प्रवाशांचे मौल्यवान वस्तू चोरीला जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे नागरिकांना प्रवासात आर्थिक फटका बसत आहे. शिवाय आरक्षित डब्यात चोरी होत असल्याने रेल्वेचा प्रवास किती सुरक्षित, असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) नेमके काय करतेय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शिवाय हरवलेल्या वस्तूंची तक्रार देण्यासाठी आल्यावर पोलिसांकडून तक्रार घेण्यास टाळाटाळ केली जात आहे. यामुळे एका प्रवाशाने ‘एक्स’वर अनुभव व्यक्त केले आहे.
मध्य रेल्वे विभागातील पुणे विभाग हा महत्त्वाचा विभाग आहे. पुणे विभागातून दररोज दीडशेपेक्षा जास्त रेल्वे गाड्या धावतात. त्यामध्ये अनेक गाड्या या लांब पल्ल्यांच्या असतात. तर पुणे विभागातून दिवसाला जवळपास दोन लाखांजवळ नागरिक प्रवास करतात. पण, गेल्या काही दिवसांपासून रेल्वे गाड्या आणि स्थानकावर प्रवाशांचा मौल्यवान ऐवज चोरीला जाण्याचे प्रकार वाढले आहेत. शिवाय स्लीपर कोचबरोबरच आरक्षित डब्यात शिरून अनेक वेळा नागरिकांचे मोबाइल व इतर ऐवज चोरीला जात असल्याचे दिसून आले आहे. या सर्व गाड्यांमध्ये आरपीएफची सुरक्षा व्यवस्था असतानाही असे प्रकार कसे घडतात, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रवासादरम्यान नागरिक मोबाइल चार्जिंगला लावून झोपतात. याच संधीचा फायदा चोरटे घेत आहेत. त्यामुळे अशा घटना रोखण्यासाठी आरपीएफकडून कडक मोहीम राबविण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे.
स्थानकांवरही चोरट्यांचा सुळसुळाट
पुणे रेल्वे स्थानकावर दिवसरात्र प्रवाशांची मोठी गर्दी असते. यामुळे किरकोळ चोरीचे प्रकार वाढले आहेत. या ठिकाणी आरपीएफ, लोहमार्ग पोलिसांची गस्त असते. पण, तरीही चोरट्यांना काहीही फरक पडत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरपीएफ व जीआरपी पोलिस करतात काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आरपीएफकडे मनुष्यबळ कमी असल्याने पुणे रेल्वे विभागातील अनेक स्थानकांवर आरपीएफचे पोलिसच तैनात नाहीत. यामुळे प्रवाशांची सुरक्षा रामभरोसे झाले आहे.
आरक्षित डब्यातून चोरी
गोव्यावरून एक प्रवासी रेल्वेने पुण्याला येत होती. आरक्षित डब्यातून प्रवास करत असताना लोणावळा येथे आल्यानंतर त्यांचा आयफोन चोरीला गेल्याचे लक्षात आले. पुण्यात उतरल्यानंतर संबंधित व्यक्ती लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेले होते. त्यावेळी पोलिसांनी मोबाइल चोरी ऐवजी हरवल्याची तक्रार घेतली. परंतु आरक्षित डब्यात चोरी कशी होते, असा प्रश्न या व्यक्तीने सोशल मीडियातून व्यक्त केला आहे.
अशी आहे आकडेवारी
-पुणे स्थानकावरून सुटणाऱ्या गाड्या : ११७
-पुणे विभागातून धावणाऱ्या गाड्या : २१०
-दैनंदिन प्रवासी संख्या : १,७०,०००