'शिरूरच्या उमेदवारीबाबत आग्रही नाही, पक्षप्रमुख ठरवतील तो निर्णय मान्य' - आढळराव पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2024 12:29 PM2024-03-08T12:29:12+5:302024-03-08T12:29:51+5:30

शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता बळावल्याने आढळरावांनी उमेदवारीवरून माघार घेतल्याचे दिसून येत आहे

There is no insistence on Shirur candidature the party chief will accept the decision shivaji rao adha rao patil | 'शिरूरच्या उमेदवारीबाबत आग्रही नाही, पक्षप्रमुख ठरवतील तो निर्णय मान्य' - आढळराव पाटील

'शिरूरच्या उमेदवारीबाबत आग्रही नाही, पक्षप्रमुख ठरवतील तो निर्णय मान्य' - आढळराव पाटील

पुणे: शिरूर लोकसभा निवडणुकीत मला तिकीट द्यावे, अशी मागणी आपण अजूनही केलेली नाही; तसेच जाहीरही केलेले नाही. पक्षप्रमुख ठरवतील तो निर्णय मान्य असेल असे सांगत शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी उमेदवारीवरून एक पाऊल मागे घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘म्हाडा’चे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर आढळराव पाटील यांना उमेदवारी मिळणार नाही, या शक्यतेला बळ मिळाले आहे. राष्ट्रवादीकडून ऑफर आल्यास स्वीकारणार काय?, याविषयी पक्षप्रमुख ठरवतील असे सांगून त्यांनी वेळ मारून नेली.

महायुतीच्या जागावाटपात शिरूर लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाईल, याची चर्चा आता जोर धरू लागली आहे. गेल्यावेळच्या निवडणुकीत पराभूत झालेले शिवसेनेचे शिवाजीराव आढळराव पाटील निवडणूक लढवण्यासाठी आग्रही होते; मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आग्रहास्तव त्यांनी ‘म्हाडा’च्या पुणे मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारले. यानंतर त्यांचा उमेदवारीचा पत्ता कट झाल्याचे बोलले जात होते. आढळराव यांनी मात्र, याचा स्पष्ट शब्दांत इन्कार केला होता. गेली पाच वर्षे मी मतदारसंघात फिरत असून, ही निवडणूक लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. त्यामुळे ही निवडणूक लढवणारच यावर ते ठाम होते; मात्र जागावाटपाची चर्चा रेंगाळल्याने; तसेच हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता बळावल्याने आढळराव यांनी उमेदवारीवरून माघार घेतल्याचे दिसून येत आहे.

‘म्हाडा’च्या सोडतीच्या पत्रकार परिषदेमध्ये आढळराव पाटील यांनी मी उमेदवारीबाबत आग्रही नसल्याचे स्पष्ट केले. पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच यासंदर्भात निर्णय घेतील. तो मला मान्य असेल असेही त्यांनी सांगितले. त्याचवेळी राष्ट्रवादीकडे हा मतदारसंघ गेल्यानंतर राष्ट्रवादीच्या तिकिटावरून लढणार काय?, या प्रश्नावरही त्यांनी पक्षप्रमुखांकडे बोट दाखवले. दोन दिवसांपूर्वी मंचर येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आढळराव पाटील यांच्या संस्थेला भेट दिली. यावेळी आढळराव पाटील राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे बोलले जात होते; मात्र आढळराव पाटील यांच्या उमेदवारीवरून कार्यकर्ते व आमदारांचा विरोध आहे. याबाबत आढळराव यांनी महायुतीचा निर्णय मान्य असेल. राष्ट्रवादीकडून लढविण्यास सांगितल्यास निवडणूक लढवू, असेही स्पष्ट केले; मात्र राष्ट्रवादीच्या आमदारांचा व कार्यकर्त्यांचा विरोध का आहे? हे अनाकलनीय असल्याचे ते म्हणाले. विरोध असताना मी राष्ट्रवादीकडे उमेदवारीसाठी जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आढळराव हे अजित पवार यांच्या गाडीत बसल्यावरून शिवसेनेच्या सचिन अहिर यांनी टीका केली होती. त्यावर, अहिर यांनी केलेल्या टीकेला मी उत्तर देणार नाही ते मला संयुक्तिक वाटत नाही. मुळात अहिर हेच राष्ट्रवादीतून शिवसेनेत दाखल झाले होते, त्यांच्या बोलण्याकडे लक्ष देण्याची गरज नाही, असे स्पष्ट केले.

Web Title: There is no insistence on Shirur candidature the party chief will accept the decision shivaji rao adha rao patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.