बारामती-इंदापूरातून लाडक्या बहिणींची नावे कमी; शेतकरी आणि बहिणींसाठी जिल्हाभर आंदोलन करणार - युगेंद्र पवार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 18:18 IST2025-09-25T18:17:54+5:302025-09-25T18:18:41+5:30
बारामतीत २५ हजार आणि इंदापुरात २७ हजार लाडक्या बहिणींची नावे कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी आणि लाडक्या बहिणींसाठी आंदोलन करावे लागेल

बारामती-इंदापूरातून लाडक्या बहिणींची नावे कमी; शेतकरी आणि बहिणींसाठी जिल्हाभर आंदोलन करणार - युगेंद्र पवार
मंचर: आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत आघाडी असो वा नसो, कार्यकर्त्यांनी पक्षाचे काम सुरू करावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते युगेंद्र पवार यांनी केले. शेतकऱ्यांसाठी आंदोलन ही काळाची गरज असून, शेतकरी आणि लाडक्या बहिणींसाठी यापुढे जिल्हाभर आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी यावेळी दिला आहे.
मंचर येथे आयोजित पक्षाच्या संघटनात्मक आढावा बैठकीत पवार बोलत होते. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेताना सांगितले की, "आपण टेक्निकली कमी पडलो. बॅलेट मतदानात आंबेगाव आणि बारामतीमध्ये आपण पुढे होतो. विजयाच्या जवळ असताना डमी उमेदवार, बोगस मतदान आणि मतचोरीमुळे पराभव झाला." तालुक्यातील 341 बूथ लेवल एजंट नेमताना प्रामाणिक आणि निष्ठावंतांना संधी देण्याचे आवाहन त्यांनी केले. "बलाढ्य शक्तींविरोधात लढताना येणाऱ्या अडचणी मला चांगल्या माहित आहेत. यापुढे मी जिल्ह्याला पूर्णवेळ देणार आहे," असे त्यांनी नमूद केले.
पवार पुढे म्हणाले, "शेतकऱ्यांसाठी आंदोलन ही काळाची गरज आहे. बारामतीत 25 हजार आणि इंदापुरात 27 हजार लाडक्या बहिणींची नावे कमी करण्यात आली आहेत. त्यामुळे शेतकरी आणि लाडक्या बहिणींसाठी आंदोलन करावे लागेल." ज्येष्ठ नेते शरद पवार यांना देशात शेतकरी नेता म्हणून ओळखले जाते, त्यांचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन त्यांनी केले. "या तालुक्यात मोठी शक्ती आहे. दहशतीच्या वातावरणात धमक्या येत असल्या तरी लोक सोबत असतील तर कोणी काहीही करू शकत नाही. युवक आणि युवतींचे संघटन मजबूत करा," असे ते म्हणाले.
माजी सभापती देवदत्त निकम यांनी सांगितले की, "लोकशाहीत खंबीर विरोधी पक्ष असल्यास सत्ताधारी झुकल्याशिवाय राहत नाहीत. येथील लोकप्रतिनिधीकडे कामे मागण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना 'ज्यांना मते दिली त्यांच्याकडे जा' असे सांगितले जाते. विकासासाठी जनतेचा पैसा आहे, कोणी कोणाला मत दिले हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जनता योग्य वेळी जागा दाखवेल." येत्या 28 तारखेला मंचर शहरात शेतकऱ्यांसाठी आंदोलन करण्याची घोषणा निकम यांनी केली.