सराफ व्यापारीच निघाला चोर; तब्बल १५० सीसीटीव्ही तपासून ४.५ लाखांची चोरी उघडकीस
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2025 15:59 IST2025-04-09T15:58:47+5:302025-04-09T15:59:19+5:30
चोर सराफी व्यावसायिक असून त्यांनी यासह इतर अजून काही गुन्हे केले आहेत का? याबाबत पोलिस सविस्तर तपास करीत आहेत.

सराफ व्यापारीच निघाला चोर; तब्बल १५० सीसीटीव्ही तपासून ४.५ लाखांची चोरी उघडकीस
वारजे : येथील व्यावसायिक महिलेच्या दुकानातून सुमारे साडेचार लाखांचे सोने व रोख रक्कम चोरणाऱ्या भामट्यास वारजे पोलिसांनी मोठ्या शिताफीने तपास करून अटक करण्याची कामगिरी केली आहे. याप्रकरणी (वर्मा, रा. पिंपरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार शमशाद लाला शेख (रा. वारजे) यांचे येथील अष्टविनायक चौक येथे मसाला विक्रीचे दुकान आहे. घरी चोरी होईल म्हणून त्या रोज आपले दागिने व रोकड असलेली पर्स दुकानात घेऊन येत असे. २२ मार्च रोजी संध्याकाळी ८ च्या सुमारास कोणीतरी त्याची पर्स दुकानातील गर्दीचा फायदा घेऊन लांबवली होती. त्याप्रमाणे वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात त्याच दिवशी सुमारे ७ तोळे सोने, तसेच चांदीचे दागिने व दोन लाख रोख असे एकूण साडेचार लाखांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती.
आपली आयुष्यभराची पुंजीच चोरीला गेली म्हणून जगण्याची उमेदच सोडलेल्या महिला व तिच्या मुलाला धीर देत वारजे पोलिस ठाण्याचे पीआय विश्वजीत काइंगडे यांनी तपास पथकाची दोन टीम तयार करत तपासासाठी चक्रे फिरवली. परिसरातील खबऱ्यांचे नेटवर्क व पोलिस कर्मचारी अमित शेलार यांना मिळालेल्या माहितीचे एकत्रित विश्लेषण केल्यावर पोलिसांनी १० दिवसांनी आरोपीबाबत निश्चित व धक्कादायक माहिती मिळाली.
त्यानंतर पोलिसांनी मोठ्या शिताफीने येथील अतुलनगर परिसरात सापळा रचून आरोपी वर्मा यास ताब्यात घेतले. त्याने केलेल्या अधिकच्या खुलाशाद्वारे तो स्वतः सराफी व्यावसायिक असून त्यांनी यासह इतर अजून काही गुन्हे केले आहेत का? याबाबत पोलिस सविस्तर तपास करीत आहेत. हस्तगत झालेले सोने व चांदी त्याने वितळवून त्याच्या पट्ट्या तयार केल्याचे आढळून आले. पोलिसांनी यापैकी चोरीस गेलेला सगळा माल हस्तगत केला आहे.
या कामगिरीत वरिष्ठ पोलिस निरीक्षक विश्वजीत काइंगडे, निरीक्षक नीलेश बडाख, उपनिरीक्षक संजय नाराळे, पोलिस कर्मचारी अर्जुन पवार, संजीव कळंबे, अमित शेलार, शरद पोळ, सागर कुंभार, बालाजी काटे, निखिल तांगडे, गोविंद कपाटे, योगेश वाघ, अमित जाधव, ज्ञानेश्वर चित्ते, गणेश शिंदे यांनी सहभाग घेतला.
दीडशे सीसीटीव्हींचा तपास
पोलिस कर्मचारी अमित शेलार यांनी वारजे, कर्वेनगर, उत्तमनगर नॉन स्टॉप पिंपरी आदी भागांतले रस्ते व इतर आस्थापनांचे सुमारे दीडशेपेक्षा जास्त सीसीटीव्ही कॅमेरे तपासून मोठ्या शिताफीने आरोपींची ओळख पटवली. सदर चोरीत आरोपीसोबत एक महिला देखील सामील असल्याचे समोर आले आहे. तसेच आरोपीचे यूपीत देखील सराफी पेढी असल्याचे समोर आल्याचे व अधिक तपास सुरू असल्याचे पोलिस सांगतात.