चालकाने जोरात हाॅर्न वाजवला; कर्णकर्कश आवाजाने नियंत्रण सुटले, डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 11:33 IST2025-11-11T11:33:44+5:302025-11-11T11:33:53+5:30
कर्णकर्कश हाॅर्नच्या आवाजामुळे दुचाकीस्वार घाबरला आणि त्याचे नियंत्रण सुटले. त्यावेळी पाठीमागून येणाऱ्या डंपरच्या चाकाखाली सापडून तरुणाचा मृत्यू झाला

चालकाने जोरात हाॅर्न वाजवला; कर्णकर्कश आवाजाने नियंत्रण सुटले, डंपरचे चाक डोक्यावरून गेल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू
पुणे : नगर रस्त्यावरील विमाननगर भागात डंपर चालकाने कर्णकर्कश हाॅर्न वाजवल्याने दुचाकीस्वार तरुणाचे नियंत्रण सुटले आणि तो रस्त्यात पडला. भरधाव डंपरच्या चाकाखाली सापडून त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी मध्यरात्री घडली. सचिन वसंत धुमाळ (२८, रा. मल्हारनगर, वडगाव शेरी) असे मृत्युमुखी पडलेल्या दुचाकीस्वार तरुणाचे नाव आहे. याबाबत स्वप्नील भानुदास माने (२५, रा. बालाजी पीजी, सोमनाथनगर,वडगाव शेरी, मूळ रा. रावरगाव, ता. सेलू, जि. परभणी) याने विमानतळ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अपघातानंतर पसार झालेल्या डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी मध्यरात्री बाराच्या सुमारास भरधाव डंपर नगर रस्त्यावरून निघाला होता. दुचाकीस्वार सचिन धुमाळ आणि स्वप्नील माने हे विमाननगर मधील टाटा गार्डन चौकातून निघाले होते. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या डंपर चालकाने जोरात हाॅर्न वाजवला. कर्णकर्कश हाॅर्नच्या आवाजामुळे दुचाकीस्वार सचिन घाबरला आणि त्याचे नियंत्रण सुटले. दुचाकी घसरल्यानंतर सचिन आणि त्याचा मित्र स्वप्नील हे रस्त्यात पडले. त्यावेळी पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या डंपरच्या चाकाखाली सापडून सचिनचा मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता डंपर चालक पसार झाला. पसार झालेल्या डंपर चालकाचा शोध घेण्यात येत असून, पोलिसंनी सीसीटीव्ही फुटेज तपासले आहे. सहायक पोलिस निरीक्षक समीर करपे पुढील तपास करत आहेत.