ताम्हिणी घाटातील 'तो' भाग अत्यंत तीव्र वळणाचा; संपूर्ण परिसर अपघातप्रवण क्षेत्र, चालकाचे नियंत्रण सुटल्याचा अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 18:23 IST2025-11-20T18:23:33+5:302025-11-20T18:23:47+5:30
पुणे जिल्हयाची हद्द संपल्यानंतर रायगड जिल्हयातील कोंडेथर गावापासून पुढे ताम्हिणी घाट सुरु होतो. हा अत्यंत तीव्र वळणाचा रस्ता आहे

ताम्हिणी घाटातील 'तो' भाग अत्यंत तीव्र वळणाचा; संपूर्ण परिसर अपघातप्रवण क्षेत्र, चालकाचे नियंत्रण सुटल्याचा अंदाज
पुणे : पुणे-माणगाव मार्गावरील ताम्हिणी घाटात ५०० फूट खोल दरीत थार गाडी कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे. दोन दिवसापूर्वी रात्रीच्या अंधारात हा भीषण अपघात घडला आहे. या अपघातातील तरुण सर्व पुण्याच्या उत्तमनगर भागातील आहेत. शहाजी चव्हाण (वय २२, रा. कोंढवे धावडे), पुनीत सुधारक शेट्टी (वय २०, रा.कोपरे गाव), साहिल साधू बोटे (वय २४, रा.कोपरे गाव), श्री महादेव कोळी (वय १८, रा.भैरवनाथ नगर), ओंकार सुनील कोळी (वय १८, रा. भैरवनाथ नगर) आणि शिवा अरुण माने (वय १९, भैरवनाथ नगर) अशी त्यांची नावे आहेत.
ताम्हिणी घाटातील एका अवघड वळणावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने थार गाडी सुमारे ५०० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघाताची घटना घडली. पुणे जिल्हयाची हद्द संपल्यानंतर रायगड जिल्हयातील कोंडेथर गावापासून पुढे ताम्हिणी घाट सुरु होतो. हा अत्यंत तीव्र वळणाचा रस्ता आहे. हा संपुर्ण परिसर अपघात प्रवणक्षेत्र आहे. येथे लोखंडी रेलींग्स आहेत. परंतू येथे घाटात जाड भिंतींची उपाययोजना तसेच वेगमर्यादा राखण्यासाठी गती नियंत्रक करणे गरजेचे आहे. आजुबाजुला उभी व खोल दरी, घनदाट जंगल असा हा परिसर आहे. वेगात असलेली वाहने वळणावर अनियंत्रीत झाल्यास दरीच्या बाजूला जातात.
नेमका अपघात घडलं कसा?
पुण्याकडून कोकणाकडे जाताना रायगड जिल्हयातील कोंडेथर गावांनतर घाट उतरताना हा अपघात घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घाटाच्या रस्त्यावर पहिल्याच तीव्र वळणावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून वाहन दरीत कोसळल्याचा अंदाज आहे. भीषण अपघातात या सहा जणांचा दुर्देवी मृत्यू झाला. अपघातस्थळी दरीत कोसळलेल्या गाडीचा व मृतदेहांचा ड्रोनच्या माध्यमातून शोध घेण्यात आला. सध्या दरीतून ४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. इतर दोघांचा शोध अजून सुरु आहे. माणगाव पोलीस आणि बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आहेत. दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या तरुणांचा शोध सुरू केल्यानंतर हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. तरुणांचे शेवटचे लोकेशन ताम्हिणी घाटातील दाखवले आहे. दरम्यान, आता शोध मोहिम सुरू करण्यात आली.
हे सर्व सहा मित्र सोमवारी म्हणजेच १७ नोव्हेंबर रोजी रात्री ११.३० वा. चार चाकी थार गाडीने पुण्यावरून कोकणात जाण्यासाठी निघाले. त्यानंतर त्यांचा कोणताही संपर्क झाला नाही. त्यामुळे पालकांनी उत्तमनगर पोलिसांत ते हरवल्याची तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि लोकेशनच्या माध्यमातून ताम्हिणी घाट परिसरात शोध घेतला. आज सकाळच्या सुमारास पोलिसांनी ताम्हिणी घाटात (जि.रायगड) अवघड वळणावर अपघात प्रवण ठिकाणी ड्रोनच्या मदतीने शोध घेतला असता दरीत थार मोटार व चार मृतदेह लांबून दिसून आले.