Shirur: घरातून ओढून नेत शिक्षकाला मारहाण; 'आमच्या शिक्षकांना न्याय द्या, दोषींना अटक करा, गावकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांचे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2026 13:47 IST2026-02-27T13:47:15+5:302026-02-27T13:47:26+5:30

अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, तर काहींनी शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत शिक्षणसंस्थांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले

Teacher dragged from home and beaten; 'Give justice to our teachers, arrest the culprits,' students protest with villagers | Shirur: घरातून ओढून नेत शिक्षकाला मारहाण; 'आमच्या शिक्षकांना न्याय द्या, दोषींना अटक करा, गावकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांचे आंदोलन

Shirur: घरातून ओढून नेत शिक्षकाला मारहाण; 'आमच्या शिक्षकांना न्याय द्या, दोषींना अटक करा, गावकऱ्यांसोबत विद्यार्थ्यांचे आंदोलन

कवठे येमाई : शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे क्रीडा शिक्षक नितीन चव्हाण यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून विद्यार्थ्यांच्या तीव्र निषेधामुळे गावात बुधवारी दिवसभर तणावाचे वातावरण होते. शिक्षकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

मंगळवारी (दि. २४) सायंकाळी चव्हाण हे आपल्या घरी विश्रांती घेत असताना पंधरा ते वीस जणांचे टोळके त्यांच्या घरात घुसले. त्यांनी शिक्षकांना जबरदस्तीने घरातून ओढत बाहेर काढले आणि काही अंतरावर नेले. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, आरोपींनी त्यांना गावातील भरचौकात आणून लाथाबुक्क्यांनी तसेच काठ्या-दांडक्यांनी बेदम मारहाण केली. काही जणांच्या हातात कोयता असल्याचेही सांगितले जात असून त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनेनंतर जखमी शिक्षकांना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप उसळला. बुधवारी सकाळपासूनच विद्यालयातील विद्यार्थ्यांनी ग्रामस्थ व पालकांसह शाळेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. “आमच्या शिक्षकांना न्याय द्या”, “दोषींना अटक करा” अशा घोषणा देत विद्यार्थ्यांनी फलक हातात घेत निषेध नोंदविला. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, तर काहींनी शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत शिक्षणसंस्थांच्या सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केले.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी केली. सुमारे चार तास चाललेल्या आंदोलनानंतर पोलिसांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले. मात्र, “कारवाई दिसली नाही तर पुन्हा आंदोलन करू,” असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे. दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. या घटनेमुळे सविंदणे परिसरात भीती व अस्वस्थता निर्माण झाली असून शिक्षकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे. शैक्षणिक वातावरण बिघडवणाऱ्या अशा प्रकारांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

Web Title : शिरूर में शिक्षक पर हमला; छात्रों का न्याय और गिरफ्तारी की मांग के साथ प्रदर्शन।

Web Summary : शिरूर में एक शिक्षक पर घर में हमला, छात्रों ने न्याय और गिरफ्तारी की मांग के साथ विरोध प्रदर्शन किया। पुलिस ने कार्रवाई का आश्वासन दिया, जिससे प्रदर्शन अस्थायी रूप से रुका। गांव में तनाव।

Web Title : Teacher assaulted in Shirur; students protest, demand justice and arrests.

Web Summary : A teacher was brutally attacked at his home in Shirur, sparking student protests demanding justice and arrests. Police assured action, temporarily halting demonstrations. Tension grips the village.