टँकरची दुचाकीला जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू, सासवड-नारायणपूर मार्गावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 23, 2025 11:48 IST2025-07-23T11:45:12+5:302025-07-23T11:48:16+5:30
अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी टँकरच्या पुढील भागात अडकली आणि तिचा पूर्णपणे चुराडा झाला.

टँकरची दुचाकीला जोरदार धडक; दोघांचा जागीच मृत्यू, सासवड-नारायणपूर मार्गावरील घटना
सासवड : सासवड-नारायणपूर मार्गावरील भिवडी (ता. पुरंदर) येथील चौधरी वस्तीजवळ डिझेल टँकर आणि दुचाकीच्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात मंगळवारी घडला. या अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला असून, टँकरचालकाविरुद्ध सासवड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कापूरहोळवरून सासवडच्या दिशेने येणाऱ्या डिझेल टँकरने (क्रमांक एमएच- १२, आरएन- ६८४३) भिवडीजवळ ओव्हरटेक करताना समोरून येणाऱ्या दुचाकीला (क्रमांक एमएच- १२, एक्सव्ही- ९४४२) जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार नंदू रत्नाकर होले (वय २२, रा. खानवडी, ता. पुरंदर) आणि त्यांच्यासोबत असलेली अपूर्वा रवींद्र कुंभारकर (वय २३, रा. कुंभारवळण, ता. पुरंदर) यांचा जागीच मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की, दुचाकी टँकरच्या पुढील भागात अडकली आणि तिचा पूर्णपणे चुराडा झाला.
मृतदेहांचे शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले असून, त्यानंतर ते नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले. सुमीत रत्नाकर होले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टँकरचालक हरिबा भिवा टोणे (वय ४१, रा. लोणी काळभोर, ता. हवेली) याच्याविरुद्ध हयगयीने आणि निष्काळजीपणे वाहन चालवल्याचा ठपका ठेवत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी करीत आहेत.