विधी प्रवेशप्रक्रिया लांबल्याने विद्यार्थी त्रासले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST2021-02-05T05:03:12+5:302021-02-05T05:03:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अमोल अवचिते पुणे : विधी महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल २७ व २८ नोव्हेंबर २०२० रोजी ...

The students were annoyed by the lengthy admission process | विधी प्रवेशप्रक्रिया लांबल्याने विद्यार्थी त्रासले

विधी प्रवेशप्रक्रिया लांबल्याने विद्यार्थी त्रासले

लोकमत न्यूज नेटवर्क

अमोल अवचिते

पुणे : विधी महाविद्यालयाच्या प्रवेश परीक्षेचा निकाल २७ व २८ नोव्हेंबर २०२० रोजी घोषित झाला. त्यानंतर कॅप राऊंडची सुरुवात झाली. २९ जानेवारी २०२१ रोजी विद्यार्थ्यांना महाविद्यालय मिळाले. त्यांनतर प्रवेशासाठी १ ते ४ फेब्रुवारी ही अंतिम तारीख प्रवेश घेण्यासाठी दिली होती. त्यामुळे प्रवेशासाठी महाराष्ट्राच्या अनेक भागातून विद्यार्थी पुण्यात आले. परंतु, महाविद्यालयात गेल्यानंतर सीईटी सेलची लिंक चालत नसल्याने विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेत प्रवेश घेता आला नाही. यामुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

दिलेल्या वेळेत प्रवेश घेण्यासाठी महाराष्ट्र, मध्य प्रदेश, आसाम, बिहार, पंजाब आदी राज्यांतून विद्यार्थी व पालक पुण्यात दाखल झाले. प्रवेश मिळेल या आशेने विद्यार्थी संबंधित महाविद्यालयात वेळे आधी पोहोचले. मात्र, १ फेब्रुवारीला लिंक सुरू झालीच नाही. त्यामुळे प्रवेश घेता आला नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे दि. २ ला देखील लिंक सुरू झालीच नाही. हा प्रकार प्रवेशाच्या (दि. ४) अंतिम तारखेपर्यत असाच प्रकार सुरू राहिल्याने तब्बल चार दिवस विद्यार्थ्यांसह पालकांना पुण्यात राहावे लागले. संबंधित विभागाला तक्रार केली असता प्रवेश प्रक्रिया आता पुन्हा नव्याने दि. ८ ते १२ फेब्रुवारी दरम्यान होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे सीईटी सेलच्या भोंगळ कारभाराला वैतागून विद्यार्थ्यांनी व पालकांना परतीचा मार्ग धरला.

चौकट

दर वर्षी तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास

मराठवाडा, गडचिरोली, गोंदिया व महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील राहणारे विद्यार्थी अनेक दूरचा प्रवास करत पुण्यात आले. चार दिवसांपासून राहण्याची अडचण निर्माण झाली. पैशांची अडचण निर्माण झाली. लॉ सीईटी सुरू होऊन ५ वर्ष होऊन सुद्धा दरवर्षी त्यांच्या तांत्रिक अडचणीमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे, असे एका विद्यार्थ्याने ‘लोकमत’ला सांगितले.

--

नेमके जबाबदार कोण, याची चौकशी करावी

चार दिवस पुण्यात थांबून देखील तांत्रिक अडचणीमुळे प्रवेश घेता आला नाही. प्रवेशासाठी आणलेले पैसे खर्च झाले. आता नव्याने दिलेल्या वेळेत पुण्यात यावे लागणार आहे. जर पुन्हा असे घडले तर याला जबाबदार कोण असणार आहे. सीईटी सेलच्या पुण्याच्या कार्यालयाने मुंबईच्या कार्यालयात संपर्क साधा, असे सांगितले. त्यामुळे नेमके याला जबाबदार कोण याची चौकशी शासनाने केली पाहिजे, अशी मागणी एका विद्यार्थ्याने ‘लोकमत’शी बोलताना केली.

Web Title: The students were annoyed by the lengthy admission process