विद्यार्थ्यांच्या मुंबई सहलीला एसटीच्या जुन्या बसमुळे ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 14:19 IST2024-12-23T14:19:33+5:302024-12-23T14:19:41+5:30
ग्रामीण भागातील शाळांवर सहल रद्द करण्याची नामुष्की

विद्यार्थ्यांच्या मुंबई सहलीला एसटीच्या जुन्या बसमुळे ब्रेक
पिंपरी :महाराष्ट्र राज्य महामार्ग परिवहन (एसटी) महामंडळाच्या अनेक आगारांत ८ वर्षांखालील नव्या बस नसल्यामुळे राज्यातील ग्रामीण भागातून मुंबईला जाणाऱ्या सहली रद्द करण्याची नामुष्की अनेक शाळांवर ओढावली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मुंबई पाहण्याचे स्वप्न यंदाही अधुरेच राहणार आहे.
इयत्ता पाचवी ते दहावीतील विद्यार्थ्यांना ऐतिहासिक, भौगोलिक, सांस्कृतिक वारसा प्रत्यक्ष पाहता यावा व त्याची माहिती मिळावी, म्हणून दरवर्षी शैक्षणिक सहलीला मान्यता देण्यात आली आहे. डिसेंबरपासून शाळांकडून शैक्षणिक सहलींचे आयोजन करण्यात येत आहे. शिक्षण विभागाने शैक्षणिक सहलीसंदर्भात नियमावली जारी केली असून, यात सहलीला फक्त एसटी बसचाच वापर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. सरकारच्या मान्यता असलेल्या शाळांना तब्बल ५० टक्के सवलत या शैक्षणिक सहलीत एसटीकडून दिली जाते. त्यामुळे शाळाही एसटी बसच्या वापरास प्राधान्य देत आहेत.
ग्रामीण भागातील मुलांना नेहमीच मुंबईचे आकर्षण असते. मुंबईत वीर जिजाबाई भोसले उद्यान (राणीची बाग), म्हातारीचा बूट, नेहरू तारांगण, तारापोरवाला मत्स्यालय, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (नॅशनल पार्क), गेट वे ऑफ इंडिया, डॉ. भाऊ दाजी लाड वस्तू संग्रहालयासह अनेक पर्यटन स्थळे आहेत. शांळाही मुलांना मुंबई दर्शन घडावे, म्हणून मुंबईत सहली काढतात. मात्र, मुंबईत सहली काढण्यासाठी शाळांना एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे.
मुंबई शहरातील वाढते प्रदूषण लक्षात घेता, उच्च न्यायालयाने आठ वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांना मुंबईत येण्यास बंदी घातली आहे. या पार्श्वभूमीवर एसटी महामंडळानेही मुंबईत जाणाऱ्या ८ वर्षांवरील जुन्या बसला बंदी घातली आहे. एसटी महामंडळाच्या ताफ्यात गेल्या अनेक वर्षांपासून नवीन बस दाखल न झाल्याने दिवसेंदिवस ताफ्यातील बस संख्या कमी होत आहे.
आगारात जुन्या बस
सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात १४ हजार बस आहेत. यातील नऊ हजारांहून अधिक बस आठ वर्षांवरील आहेत. ग्रामीण भागातील सर्वच आगारांत जुन्या बस आहेत. त्यामुळे मुंबईच्या सहलीसाठी बसची मागणी करणाऱ्या शाळांना महामंडळाकडून आठ वर्षांखालील बस उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. नवीन बस नसल्यामुळे अनेक शाळांवर मुंबईतील सहलीचे नियोजन रद्द करण्याची नामुष्की ओढावली आहे.
एसटी महामंडळाच्या ताफ्यात जानेवारीपासून नवीन बस दाखल होणार आहेत. या बस आल्यानंतर शालेय सहलींसाठी प्राधान्य दिले जाईल.
- अभिजीत भोसले, जनसंपर्क अधिकारी, एसटी महामंडळ.