रेल्वेत प्रवाशांचे पाकीट चोरणे पडले महागात; आता ३ महिने कारागृहात अन् एक हजार दंड
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2026 12:16 IST2026-03-04T12:16:11+5:302026-03-04T12:16:44+5:30
दंडाची रक्कम न भरल्यास दहा दिवसांचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे

रेल्वेत प्रवाशांचे पाकीट चोरणे पडले महागात; आता ३ महिने कारागृहात अन् एक हजार दंड
पुणे : रेल्वे प्रवासादरम्यान प्रवाशांचे पाकीट चोरणाऱ्या मलंग अर्जुन वादवाणी (३४) यास न्यायालयाने तीन महिन्यांचा साधा कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. लोहमार्ग न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एन. जे. चव्हाण यांनी हा निकाल दिला. दंडाची रक्कम न भरल्यास दहा दिवसांचा साधा कारावास भोगावा लागेल, असेही निकालात नमूद करण्यात आले आहे.
२४ जुलै २०२२ रोजी फिर्यादी दीपक गायकवाड हे पुणे ते लोणावळा लोकलने देहूरोड ते मळवली असा प्रवास करीत होते. गाडी तळेगाव स्थानक येथे आल्यानंतर वादवाणी व त्याच्या साथीदारांनी संगनमत करून फिर्यादी यांच्या खिशातील पाकीट चोरून करून पळून जात होते. यावेळी, त्याठिकाणी असलेल्या दामिनी पथकातील पोलिस अंमलदारांनी त्याला पकडले. याप्रकरणी, त्यास अटक करून परिस्थितीजन्य आणि तांत्रिक पुराव्यांसह न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे ॲड. अश्विनी काळे आणि ॲड. पल्लवी काशीद यांनी बाजू मांडली.