साडेतीन शक्तिपीठ दर्शनातून एसटी विभागाला १२ लाखांचे उत्पन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 15:27 IST2025-10-03T15:24:48+5:302025-10-03T15:27:54+5:30
कोल्हापूर (महालक्ष्मी), तुळजापूर (तुळजाभवानी), माहूर (रेणुका देवी) ही पूर्ण शक्तिपीठे आणि वणीचे (नाशिक) सप्तशृंगी मंदिर या अर्ध्या शक्तिपीठाच्या दर्शनाची सोय करण्यात आली होती

साडेतीन शक्तिपीठ दर्शनातून एसटी विभागाला १२ लाखांचे उत्पन्न
पुणे : नवरात्रोत्सवात देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी असते. त्यामुळे पुणे विभागातून साडेतीन शक्तिपीठ दर्शनासाठी शिवाजीनगरमधून सात, पिंपरी-चिंचवड तीन आणि मंचरमधून एक अशा तीन आगारांतून एकूण ११ बस सोडण्यात आले होते. या बस (दि. २७) सप्टेंबर रोजी सकाळी सात वाजता निघाले होते. तीन आगारातून ११ बसमधून ४०० भाविक गेले होते. यातून १२ लाखांचे उत्पन्न पुणे एसटी विभागाला मिळाले, अशी माहिती एसटी प्रशासनाकडून
देण्यात आले.
साडेतीन शक्तिपीठ दर्शनासाठी पहिल्या दिवशी कोल्हापूर महालक्ष्मीचे दर्शन करून तुळजापूर येथे मुक्काम करण्यात आले. नवरात्रोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. या काळात देवदर्शनाला जाणाऱ्या भाविकांचे प्रमाण जास्त असते. काही भाविक गटाने बुकिंग करून देवदर्शन करतात. या भाविकांचे देवदर्शन आणि प्रवास सुरक्षित, सुखकर व्हावा यासाठी एसटीकडून शक्तिपीठ दर्शन बसचे आयोजन करण्यात आले होते. पुणे विभागातून ११ बस गेले होते. यामध्ये कोल्हापूर (महालक्ष्मी), तुळजापूर (तुळजाभवानी), माहूर (रेणुका देवी) ही पूर्ण शक्तिपीठे आणि वणीचे (नाशिक) सप्तशृंगी मंदिर या अर्ध्या शक्तिपीठाच्या दर्शनाची सोय करण्यात आली होती.
नवरात्रोत्सवात भाविकांना देवीच्या दर्शनासाठी सोय व्हावी, यासाठी शिवाजीनगर आगारातून सात बस सोडण्यात आले होते. याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. यामध्ये शिवाजीनगर आगारातील सर्वाधिक बस होते. -संजय वाळवे, वरिष्ठ आगारप्रमुख, शिवाजीनगर.