जागा पुरणार नाही एवढे मराठे येतील; करोडोंच्या संख्येने मुंबईवर धडकतील, आरक्षण घेऊनच येणार - मनोज जरांगे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2025 13:30 IST2025-07-21T13:29:59+5:302025-07-21T13:30:40+5:30
ज्या मराठ्यांच्या जिवावर अनेक आमदार निवडून आले, ते आमदार मराठा समाजासाठी आरक्षणाचा एक शब्दही बोलत नाहीत

जागा पुरणार नाही एवढे मराठे येतील; करोडोंच्या संख्येने मुंबईवर धडकतील, आरक्षण घेऊनच येणार - मनोज जरांगे
वाघोली : मराठा आरक्षणासाठी २७ ऑगस्टपासून करोडोंच्या संख्येने मराठा मुंबईवर धडकणार असून, आरक्षण घेऊनच मी आणि मराठा बांधव परत येतील, असे मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी सांगितले. जरांगे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना वाघोली येथे रविवारी (दि. २०) पुणे जिल्ह्यातील पदाधिकारी, मराठा बांधवांशी संवाद साधून चर्चा केली. वाघोली येथे दिवसभर नागरिकांनी गर्दी केली होती.
जरांगे म्हणाले की, ज्या मराठ्यांच्या जिवावर अनेक आमदार निवडून आले, ते आमदार मराठा समाजासाठी आरक्षणाचा एक शब्दही बोलत नाहीत. सरकारकडे दोन वर्षांपासून शांततेत मागणी करूनही आरक्षणाची अंमलबजावणी केली नसल्याने मुंबईला येण्याची वेळ सरकारने आणली आहे. मुंबईत जागा पुरणार नाही एवढे मराठे येतील व मराठा बांधव आरक्षण आणि विजय घेऊनच परत येणार, चर्चेचा मार्ग आता नाही, असा इशारा जरांगे यांनी यावेळी दिली. शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन करण्यात येणार आहे. याला विरोध करण्याचा किंवा मराठ्यांना रोखण्याचा प्रयत्न सरकारने चुकूनही करू नये. २७ ऑगस्टपासून अंतरवाली ते पैठण मार्गे शेवगाववरून अहिल्यानगर, आळेफाटा मार्गे जुन्नर शिवनेरी येथे नतमस्तक होऊन माळशेज घाटातून कल्याण चेंबूरमार्गे मुंबईला जाणार असल्याचे जरांगे यांनी सांगितले. यावेळी मोठ्या संख्येने मराठ्यांसह इतर बांधवांनीही पाठिंबा दिला.