...तर धनगर समाजाची एकत्रित ताकद दाखवून देऊ; आरक्षणाबाबत गोपीचंद पडळकरांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 11:10 AM2023-10-17T11:10:12+5:302023-10-17T11:11:14+5:30

समाज एकत्रित करुन रस्त्यावरची लढाई लढणे राज्य सरकारला ताकद दाखवून देणे हा प्लॅन बी

...so let us show the collective strength of Dhangar society; Gopichand Padalkar's warning about reservation | ...तर धनगर समाजाची एकत्रित ताकद दाखवून देऊ; आरक्षणाबाबत गोपीचंद पडळकरांचा इशारा

...तर धनगर समाजाची एकत्रित ताकद दाखवून देऊ; आरक्षणाबाबत गोपीचंद पडळकरांचा इशारा

इंदापूर: डिसेंबर महिन्याच्या अखेरीपर्यंत धनगर आरक्षण अंमलबजावणी संदर्भात उच्च न्यायालयाकडून अपेक्षित निर्णय होण्याची शक्यता आहे. तसे झाले नाही तर समाजाची एकत्रित ताकद दाखवून राज्यशासनाकडे अनुसूचित जमातीचे आरक्षण देण्याची मागणी करण्यात येईल, असा संकेत आ. गोपीचंद पडळकर यांनी आज (दि.१६) नगरपरिषदेच्या प्रांगणात झालेल्या धनगर समाज बांधवाच्या मेळाव्यात दिला. धनगर जागर यात्रेनिमित्त हा मेळावा घेण्यात आला होता.

 ते पुढे म्हणाले की,धनगर आरक्षणाचा खटला  न्यायालयात लढवणे हा आपला प्लॅन ए आहे. समाज एकत्रित करुन रस्त्यावरची लढाई लढणे राज्य सरकारला ताकद दाखवून देणे हा प्लॅन बी आहे. त्यासाठी आपण धनगर जागर यात्रेचे आयोजन केले आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचे प्रकरण उच्च न्यायालयाच्या विचाराधीन आहे. आरक्षणासंदर्भात जे अपेक्षित होते ते राज्यसरकारने तीन शपथपत्रांमध्ये सादर केले आहे. आरक्षणाबाबत राज्यसरकारने न्यायालयात ठाम बाजू मांडली आहे. आठ, अकरा व पंधरा डिसेंबर या दिवशी आरक्षणाच्या प्रकरणासाठी अंतीम सुनावणी ठेवली आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गेल्या सत्तर वर्षाच्या अन्यायास वाचा फुटेल. धनगराच्या पोराच्या अनुसूचित जमातीचा दाखला मिळेल,याची खात्री आहे, मात्र काही उलटसुलट झाल्यास एकत्रित येवून राज्यशासनाला समाजाची ताकद दाखवून देवू. राज्यशासनाने दाखला देण्याची प्रक्रिया सुरु करावी अशी मागणी करु,असे ते म्हणाले.

 जागर यात्रा सुरु केली. त्यावेळी लांडग्याची सारी पिल्ले जागी झाली आहेत. एकीकडे आरक्षणाची केस न्यायालयात प्रलंबित आहे दुसरीकडे जागर यात्रा काढतोय असे बोलले जात आहे. पुण्याचा परिसरातील धनगराच्या व जेजुरीमधील होळकरांच्या जमिनी, रामोशी समाजाच्या वतनाच्या, महार वतनाच्या जमिनी कागदोपत्री फेरफार करुन प्रस्थापितांच्या बगलबच्च्यांनी लाटल्या. या जमिनी परत काढून घ्याव्या आहेत. त्यासाठी ताकदीने उभे रहावे लागेल,असे ते म्हणाले.

प्रत्येक बहुजन आपला भाऊ
    
धनगर समाजाच्या भल्यासाठी सगळ्या पोटजाती विसरुन एकत्र आले पाहिजे. जेवढे गट पडतील तेवढे ते प्रस्थापितांसाठी चांगले आहे. त्यामुळे शाखाभेद करण्याचे प्रयत्न होत आहेत. हे घातक आहे. आत्ता ज्यावेळी जनगणना येईल त्यावेळी पोटजातीचा कोठे ही उल्लेख करु नका,असे आवाहन त्यांनी केले. आपले आराध्य दैवत खंडोबा बिरोबा आहे. खंडोबाचा भंडारा लावलेला प्रत्येक बहुजन आपला भाऊ आहे हे समजून सर्वांची एकजूट करायची आहे हे लक्षात ठेवा,असे ही त्यांनी सांगितले.
   
 'एसटीडी' मध्ये किती दिवस गुरफटणार

एस म्हणजे साहेब,टी म्हणजे ताई व डी म्हणजे दादा अशी फोड करुन या 'एसटीडी' मध्ये किती दिवस गुरफटणार आहात, असा सवाल त्यांनी उपस्थितांना केला. 'त्या' गुलामगिरीतून बाहेर पडा. एकदिवस तुम्ही राजा व्हाल. गुलामगिरीत ठेवण्यासाठीच साहेब ताईसाहेब दादासाहेब असे चालले आहे. आपला साहेब एकच डॉ. बाबासाहेब. दुसरे कोणी नाही. त्यांच्यामुळेच आपण माणसात आहोत, असे आ. पडळकर म्हणाले.

Web Title: ...so let us show the collective strength of Dhangar society; Gopichand Padalkar's warning about reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.