Success Story: वडील विकायचे फळं, मुलानं उभी केली ४०० कोटींची कंपनी; आज आहे मोठा आईस्क्रीम ब्रँड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 09:04 AM2024-05-17T09:04:10+5:302024-05-17T09:39:41+5:30

Success Story: १९८४ मध्ये मुंबईतून सुरू झालेला झालेला हा ब्रँड आज अनेकांच्या आवडीचा ब्रँड बनला आहे. शून्यातून ४०० कोटींपर्यंतचा हा प्रवास कसा होता हे आज आपण जाणून घेऊ.

Success Story: आतापर्यंत अशा अनेक उद्योजकांच्या यशाच्या कहाण्या तुम्ही ऐकल्या किंवा वाचल्या असतील, ज्यांनी आपल्या मेहनतीच्या जोरावर मोठं साम्राज्य उभं केलं. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, ज्यानं आपल्या मेहनतीच्या जोरावर ४०० कोटी रुपयांची कंपनी उभी केली आहे.

आज आम्ही तुम्हाला नॅचरल्स आईस्क्रीम (Natural Ice Cream) प्रोडक्टला ब्रँड बनवण्याची कहाणी सांगणार आहोत. रघुनंदन श्रीनिवास कामथ (Raghunandan kamath) यांनी १९८४ मध्ये मुंबईत याची सुरुवात केली होती. नैसर्गिक आइस्क्रीम प्रत्येक घरात पोहोचवण्यासाठी कामत यांनी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं. त्यांनी इतकं यश कसं मिळवलं आणि आपला व्यवसाय कसा मोठा केला याबद्दल जाणून घेऊ.

रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे वडील कर्नाटकातील मंगळुरु जिल्ह्यातील एका गावात आंबे विकायचे. रघुनंदन हे फळांची योग्य निवड करणं आणि त्यांना सुरक्षित ठेवण्याचं काम वडिलांकडून शिकले. अनेक वर्षे वडिलांसोबत राहून फळांची निवड करणं आणि जतन करण्याच्या अनुभवानंतर व्यवसाय करण्याच्या योजनेसह ते मुंबईत आले.

रघुनंदन कामथ यांनी १४ फेब्रुवारी १९८४ रोजी त्यांचा पहिला आइस्क्रीम ब्रँड नॅचरल्स लाँच केला आणि मुंबईतील जुहू येथे पहिले स्टोअर उघडले. त्यावेळी त्यांच्या कंपनीत फक्त चार कर्मचारी होते आणि त्यांनी १० फ्लेवर्सच्या आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू केला.

रघुनंदन यांनी जेव्हा आईस्क्रीमचा व्यवसाय सुरू केला तेव्हा त्यांच्या जुहू येथील आइस्क्रीम पार्लरमध्ये फारसे लोक येत नव्हते. ते नॅचरस आईस्क्रीम तयार करत होते. मात्र ग्राहकांची संख्या खूपच कमी होती. अशा परिस्थितीत त्यांनी मार्ग काढला. रघुनंदन यांनी आईस्क्रीमसोबत मसालेदार पावभाजी आणली.

आता पावभाजी खाल्ल्यानंतर अनेक लोक तिकडे गोड आणि थंड आईस्क्रीम खायचे. ते फक्त फळे, दूध आणि साखरेच्या मदतीनं आईस्क्रीम बनवत होते. त्यात कोणतीही भेसळ नव्हती. यामुळेच लोकांचा हळूहळू त्यांच्यावरचा विश्वास वाढू लागला. रघुनंदन यांच्या आईस्क्रीम पार्लरमध्ये ग्राहकांची संख्या वाढू लागली.

कामथ यांच्या जुहू येथील कोळीवाडा परिसरात असलेल्या २०० स्क्वेअर फुटांच्या छोट्या दुकानानं पहिल्या वर्षी ५,००,००० रुपयांचा व्यवसाय केला. वर्षभरानंतर त्यांनी आईस्क्रीमचा संपूर्ण ब्रँड तयार करण्यासाठी पावभाजी ठेवणं बंद केलं. कामथ यांचं सहा टेबल असलेलं रेस्तराँ आता ५ फ्लेवर्समध्ये फ्रोझन फ्रूट आइस्क्रीम देत होते. त्यात कस्टर्ड अॅपल, काजू मनुका, आंबा, चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी फ्लेवर्ड अशा आइस्क्रीमचा समावेश होता.

आज नॅचरल्स आईस्क्रीमचे देशभरात १३५ पेक्षा जास्त आउटलेट्स आहेत. या आऊटलेट्सवर जॅकफ्रूट, कोकोनट अशा २० फ्लेवर्सचं आईस्क्रीम विकलं जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, नॅचरल्स आइस्क्रीमची उलाढाल ४०० कोटी रुपयांच्या पुढे गेली आहे.

कामथ यांनी जवळपास ४ दशकांपासून आपल्या आईस्क्रीमची खासियत राखली आहे. यात कोणताही रंग किंवा केमिकल मिक्स केलं जात नाही. कामथ यांचं आईस्क्रीम पूर्णपणे नैसर्गिक उत्पादनांवर अवलंबून आहे.