श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 'या' तारखेला खुलं केलं जाणार, मुदतवाढ दिली जाणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2026 12:45 IST2026-02-16T12:42:47+5:302026-02-16T12:45:05+5:30

पुढील तीन महिन्यांत खोदाई, तोडफोड इत्यादी कामे पूर्ण होतील, त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुलं केलं जाईल, उर्वरित कामं हळूहळू सुरू राहतील

Shri Kshetra Bhimashankar Temple will be opened on 'this' date, no extension will be given, District Collector informs | श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 'या' तारखेला खुलं केलं जाणार, मुदतवाढ दिली जाणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर 'या' तारखेला खुलं केलं जाणार, मुदतवाढ दिली जाणार नाही, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

भीमाशंकर : श्रीक्षेत्र भीमाशंकरमंदिर १० एप्रिल २०२६ पासून सर्व दर्शनार्थींना खुलं केलं जाईल. यामध्ये कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नाही. जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी भीमाशंकर येथे महाशिवरात्रीच्या शासकीय पूजेस उपस्थित असताना सांगितलं की, श्रावण महिन्यापर्यंत सर्व व्यवस्था पूर्ण होतील असा विश्वास आहे.

यावेळी भीमाशंकर देवस्थानचे अध्यक्ष सुरेश कौदरे, उपकार्यकारी विश्वस्त मधुकर गवांदे, गणेशनाथ महाराज, प्रांत अधिकारी गोविंद शिंदे, अनिल दोंडे व इतर उपस्थित होते. श्री क्षेत्र भीमाशंकर येथे सुरू असलेल्या कामांमुळे ९ जानेवारीपासून मंदिर बंद ठेवावे लागले. यासाठी सर्व भक्तांनी प्रशासनाला सहकार्य केल्याबद्दल डूडी यांनी सर्वांचे आभार मानले. तीन महिन्यांत खोदाई, तोडफोड इत्यादी कामे पूर्ण होतील, त्यानंतर दर्शनासाठी मंदिर खुलं केलं जाईल. उर्वरित कामं हळूहळू सुरू राहतील. तसेच श्रीक्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा राबवताना स्थानिकांना विश्वासात घेऊन कामे सुरू आहेत, ज्यामुळे स्थानिकांनाही आर्थिक लाभ होईल. दरवर्षी येथे भीमाशंकर महोत्सव आयोजित करण्याचे नियोजन आहे, त्यामुळे स्थानिक आदिवासी लोकांना फायदा होईल. आराखडा पूर्ण झाल्यावर भाविकांची संख्या चारपट वाढेल. भीमाशंकर येथे अस्वच्छ पाण्याचा मोठा प्रश्न होता, वन्यजीव विभागाकडून नुकतीच या पाण्याचा निचरा करण्यासाठी मान्यता मिळाली आहे. सध्या सुरू असलेल्या कामांसोबत पाणीपुरवठा व अस्वच्छ पाण्याचा निचरा करण्याचं काम देखील पूर्ण करण्यात येत आहे. खांडसमार्गे भीमाशंकरमध्ये येण्यासाठी लवकरच रोपवे बनवला जाणार आहे.

शेकरू संवर्धनाचा पूर्ण विचार भीमाशंकर आराखड्यात करण्यात आला आहे. २०२१ मध्ये भीमाशंकर अभयारण्यात १८०० शेकरू होते, तर सध्या २३४० शेकरू येथे आहेत. वन्यजीव विभागाने केलेल्या चांगल्या कामामुळे येथे शेकरूंची संख्या वाढली आहे. नुकत्याच झालेल्या पूर्ण ग्रॅड टूरचे मॅस्कॉट शेकरू होते. या स्पर्धेमुळे आपल्या भागातील शेकरू जगभरात पोहोचले. अनेक वन्यजीव अभ्यासक शेकरूच्या अभ्यासासाठी येथे यायची इच्छा व्यक्त करत आहेत. यामुळे शेकरूंची संख्या वाढेल व संवर्धन होईल.

कुंभमेळापूर्वी भीमाशंकरकडे येणारे प्रमुख तीन रस्ते सुधारले जाणार आहेत. यामध्ये तळेगाव टोलनाक्यापासून भीमाशंकरपर्यंतचा रस्ता, चाकण राजगुरुनगर व मंचर घोडेगावमार्गे जाणारा रस्ता पूर्ण केला जाईल. तसेच भीमाशंकरकडे जाणारे तळेघर, शिरगाव, भोरगिरी, निगडाळे येथील छोटे मोठे रस्तेही सुधारले जाणार आहेत.

Web Title: Shri Kshetra Bhimashankar Temple will be opened on 'this' date, no extension will be given, District Collector informs