शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना! १४ मजुरांना डांबून मारहाण, गुऱ्हाळ मालकावर गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2025 20:08 IST2025-07-30T20:07:40+5:302025-07-30T20:08:03+5:30
मालकाने गेल्या काही दिवसांपासून् त्यांच्या झोपड्यातून बाहेर पडू दिले नाही, यात लहान मुलगी आजारी असताना तिला उपचारही घेऊ दिले नाहीत

शिरूर तालुक्यातील धक्कादायक घटना! १४ मजुरांना डांबून मारहाण, गुऱ्हाळ मालकावर गुन्हा दाखल
शिरूर/न्हावरे : शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथे गुऱ्हाळावर ऊस तोडीचे काम करणाऱ्या मजुरांना वेठबिगारी म्हणून राबवण्यात आले. घरी जाण्याचा प्रयत्न केल्यानंतर गेल्या काही दिवसापासून डांबून ठेवत बेदम मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या प्रकाराची माहिती मिळाल्यानंतर लेबर लाईन या समाजिक संस्थेने प्रशासन व पोलिसांच्या मदतीने लहान मुलांसह १४ मजुरांची आज सुटका केली. या प्रकरणी आलेगाव पागा येथील गुऱ्हाळ मालक संदीप
डुबे यावर वेठबिगारी कामगार, डांबून ठेवणे, मारहाण आर्थिक फसवणूक व बालकामगार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आलेगाव पागा येथील डुबे यांच्या गुऱ्हाळावर छत्रपती संभाजीनगर जिल्हातील पैठण तालुक्यातील ब्रह्मगाव येथील 7 मजूर त्यांच्या मुलांसह ऊस तोडीचे काम करत होते. दोन वर्ष त्यांच्याकडून रात्रंदिवस काम करून घेण्यात आले. त्यांना गावी जाऊ दिले नाही. त्यांच्या वरील आगाऊ उचलीची रक्कम कामातून फिटली असतानाही लाखो रुपये बाकी असल्याचे सांगत गुऱ्हाळ मालक डुबे त्यांच्याकडून जबरदस्तीने काम करून घेत होता. तसेच त्यांच्या 6 लहान मुलांकडून गुऱ्हाळ, घोटा तसेच घरातील कामे करून घेत होता. या मजुरांनी घरी जाण्याची मागणी केली असता गेल्या काही दिवसांपासून् त्यांच्या झोपड्यातून त्यांना बाहेर पडण्यास मज्जावं करण्यात आला. यात लहान मुलगी आजारी असताना तिला उपचारही घेऊ दिले नाहीत. अखेर या मजुरापैकी ज्ञानेश्वर साहेबराव चव्हाण याने पुण्यातील लेबर लाईन संस्थेशी संपर्क साधून मदत मागितली. संस्थेने सहानिशा करून आज जिल्हाधिकारी, कामगार आयुक्त, पोलीस अधीक्षक यांच्याशी संपर्क साधत मदत मागितली. याची गंभीर दखल घेत जिल्हयाचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी त्वरीत संबधित कामगारांची मुक्तता करण्याचे आदेश दिले. त्यानुसार त्यांनी आलेगाव पागा येथे जाऊन सबंधित कामगारांची सुटका केली. त्यांचे सर्व साहित्य गाडीत भरून त्यांना शिरूर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. याठिकाणी गुऱ्हाळ मालका विरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर शिरुर तहसिल कार्यालयातून त्यांना सुटकेचे प्रमाणपत्र देखील देण्यात आले. सर्व मजुरांना पोलीस संरक्षणात त्यांच्या गावी पोहोचवण्यात आले.