Pune: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 19:12 IST2026-01-08T19:10:55+5:302026-01-08T19:12:09+5:30
महिनाभरापूर्वी ५ डिसेंबरला वनराई संस्थेच्या वार्षिक विशेषांकाच्या प्रकाशनावेळी दिलेले त्यांचे भाषण हे त्यांच्या आयुष्यातील अखेरचे भाषण ठरले

Pune: ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
पुणे : पर्यावरण संवर्धनासाठी आयुष्य समर्पित करणारे ज्येष्ठ पर्यावरणशास्त्रज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या पार्थिवावर गुरुवारी (दि. ८) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. बंदुकीच्या तीन फैऱ्या झाडून त्यांना मानवंदना देण्यात आली. पर्यावरणप्रेमींसह पुणेकरांनी साश्रुनयनांनी त्यांना भावपूर्ण निरोप दिला. यावेळी डॉ. गाडगीळ यांचे कुटुंब, त्यांचे विद्यार्थी आणि पर्यावरण क्षेत्रातील काम करणारे स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. दरम्यान, राजकीय, सामाजिक आणि पर्यावरण क्षेत्रातील विविध मान्यवरांकडून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
महिन्याभरापूर्वीचे भाषण अखेरचे ठरले
महिनाभरापूर्वी ५ डिसेंबरला वनराई संस्थेच्या वार्षिक विशेषांकाच्या प्रकाशनावेळी दिलेले त्यांचे भाषण हे त्यांच्या आयुष्यातील अखेरचे भाषण ठरले. प्रकृती अत्यंत नाजूक असतानाही त्यांनी देवरायांच्या संरक्षणाबाबत व्यक्त केलेली चिंता आणि “देवराया वाचल्या तर माणसे वाचतील” हा दिलेला संदेश आज अधिकच अर्थपूर्ण वाटतो, असे वनराईचे कार्यकारी संपादक अध्यक्ष रवींद्र धारिया यांनी सांगितले.
बांबूच्या मेस या प्रजातीचे नामकरण डॉ. गाडगीळ यांच्या नावाने ‘सुडोओक्सिट्रेनानथेरा माधवी’
सह्याद्रीच्या जंगलात आढळणाऱ्या बांबूच्या मेस आणि माणगा या प्रजातींमधील फरक पहिल्यांदाच संशोधनातून स्पष्ट झाला. ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांच्या सन्मानार्थ बांबूच्या मेस या प्रजातीचे नामकरण ‘सुडोओक्सिट्रेनानथेरा माधवी’ असे करण्यात आले आहे. बांबूच्या मेस या प्रजातीवर निगडी येथील ज्ञानप्रबोधिनी जैवतंत्रज्ञान विभागात बांबूवर संशोधन आणि अभ्यास सुरू आहे. ही प्रजाती जिल्ह्यातील वेल्हे भागातही आढळते. या प्रजातीचे टिशू कल्चर पद्धतीने तयार केलेले रोपटे डॉ. गाडगीळ यांना देण्याची इच्छा होती. मात्र, इच्छा अपूर्णच राहिली असल्याची खंत विभागाच्या संचालिका संगीता कुलकर्णी यांनी व्यक्त केली. हे रोप आता गाडगीळ यांच्या कुटुंबीयांना देऊ, असेही त्या म्हणाल्या.
माधव गाडगीळ यांची पुस्तके
निसर्ग नियोजन - लोकसहभागाने
निसर्गाने दिला आनंदकंद
मुंग्या आणि माणसाच्या जीवनशैलीतले साम्य शोधणाऱ्या ’ॲन्टहिल’ पुस्तकाचा अनुवाद असलेले ’वारूळपुराण’
बहरू दे हक्काची वनराई.
विविधता – जीवनाची कोनशिला (मूळ इंग्रजी, मराठी अनुवादक प्रा. रा.वि. सोवनी)
उत्क्रांती एक महानाट्य
सह्याद्रीची आर्त हाक
वारूळ पुराण
इंग्रजी पुस्तके
डायव्हर्सिटी; द कॉर्नर स्टोन ऑफ लाईफ
इकोलॉजिकल जर्नीज
इकॉलॉजी अँड इक्विटी
Nurturing Biodiversity: An Indian Agenda
पीपल्स बायोडायर्व्हर्सिटी रजिस्टर्स ; अ मेथडॉलीजी मॅन्युअल
द फिशर्ड लँड
गाडगीळ सरांना मिळालेले पुरस्कार
जीवशास्त्रांसाठीचा शांतिस्वरूप भटनागर पुरस्कार, विक्रम साराभाई पुरस्कार, ईश्वरचंद्र विद्यासागर पुरस्कार, हार्वर्ड विद्यापीठाचे शतवार्षिक पदक, कर्नाटक सरकारचा राज्योत्सव पुरस्कार, विज्ञान आणि तंत्रज्ञानातील अत्युच्च प्रावीण्याबद्दल फिरोदिया पुरस्कार, उष्णकटिबंधीय जीवशास्त्र आणि त्याचे संरक्षण या विषयांवर केलेल्या संशोधनात्मक कामगिरीसाठी ATBC (असोसिएशन फॉर ट्रॉपिकल बायॉलॉजी अँड कॉन्झर्व्हेशन) या संस्थेची मानद फेलोशिप, सदर्न कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीचा सन २०१५ चा टायलर पुरस्कार, पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने समाजाच्या १४६व्या स्थापनादिनानिमित्त पुरस्कार, प्रदीर्घ प्रस्तावना असलेल्या वारूळ पुराण या पुस्तकास मराठी साहित्य परिषदेतर्फे विशेष ग्रंथकार पुरस्कार २०१८, उत्क्रांती: एक महानाट्य या पुस्तकास अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे दिला जाणारा उत्कृष्ट ग्रंथनिर्मिती पुरस्कार २०२०, कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा गोदावरी गौरव पुरस्कार २०२०, उत्क्रांती: एक महानाट्य या पुस्तकास राठी विज्ञान परिषदेतर्फे विज्ञान पुस्तक पुरस्कार २०२१.