नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाळू माफियांना दणका! ३ लाखांची वाळू उपसा बोट नष्ट, महसूल विभागाची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2025 19:07 IST2025-01-02T19:06:37+5:302025-01-02T19:07:34+5:30
आरोपी फायबर बोट वाळू चोरी करण्याच्या उद्देशाने पाणलोट क्षेत्रात अवैद्यरित्या घुसवत असल्याचे अधिकाऱ्यांना आढळून आले होते

नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाळू माफियांना दणका! ३ लाखांची वाळू उपसा बोट नष्ट, महसूल विभागाची कारवाई
इंदापूर: नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरडेवाडी गावच्या हद्दीत लोंढेवस्ती लगतच्या उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वाळू उपसा करणारी ३ लाखांची फायबर बोट नष्ट करुन, बोटीत असणारी १६ हजारांची दोन ब्रास वाळू नदीपात्रात बुडवून नाश करत तहसीलदार व महसूल विभागाच्या पथकाने वाळू माफियांना ३ लाख १६ दणका दिला आहे. या प्रकरणी एक जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिल्या उर्फ सौरभ वाघमारे (रा. सरडेवाडी ता. इंदापूर) असे आरोपीचे नाव आहे. मंडल अधिकारी शाम झोडगे यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे. तहसीलदार जीवन बनसोडे,नायब तहसीलदार अविनाश डोईफोडे, मंडल अधिकारी औदुंबर शिंदे, तलाठी अशोक पोळ, वैशाली कारंडे, कांता देशमुख, मनीषा पोळ,राजश्री ढमे, वैभव मुळे,भास्कर घोळवे, पोलीस कर्मचारी वैभव गरड, सूर्यवंशी यांनी ही कारवाई केली आहे.
सरडेवाडी गावच्या हद्दीत लोंढेवस्ती येथे उजनी जलाशयाचे पाणलोट क्षेत्रात एक फायबर बोट वाळु या गौण खनिजाची चोरी करण्याचे उद्देशाने पाणलोट क्षेत्रात अवैद्यरित्या घुसवण्यात येत आहे. अशी खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार जीवन बनसोडे यांनी महसूल विभागातील कर्मचा-यांना तशी कल्पना दिली. सर्वजण घटनास्थळी गेल्यानंतर आरोपी पिल्या उर्फ सौरभ वाघमारे हा त्याच्या साथीदारासह त्याच्या ताब्यातील फायबर बोट वाळू चोरी करण्याच्या उद्देशाने पाणलोट क्षेत्रात अवैद्यरित्या घुसवत असल्याचे आढळले. महसूल विभागाच्या पथकाचा सुगावा लागल्यानंतर पिल्या व त्याचे साथीदार लगत असणा-या ऊसाच्या फडाचा फायदा घेवून तेथुन पळून गेले. महसूल विभागाच्या पथकाने ती बोट ताब्यात घेवून पडस्थळ व सुगावचे पोलीस पाटील, शिपाई यांच्या सहकार्याने नष्ट करुन तिच्यात असणारी दोन ब्रास वाळू उजनी जलाशयामध्ये बुडवुन नाश केली आहे. आरोपी पिल्या उर्फ सौरभ वाघमारे व त्याच्या साथीदारासह यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.