Pune: सुरक्षा साधने, चालकांची पात्रता, सीसीटीव्ही; अपूर्ण सुविधा, नियम मोडणाऱ्या २४९ स्कुल बसवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 10:41 IST2025-12-06T10:40:05+5:302025-12-06T10:41:19+5:30
नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाईसोबतच पुढील वाहतूक परवान्यांवरही परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे

Pune: सुरक्षा साधने, चालकांची पात्रता, सीसीटीव्ही; अपूर्ण सुविधा, नियम मोडणाऱ्या २४९ स्कुल बसवर कारवाई
पुणे: शहरातील शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात आलेल्या विशेष तपासणी मोहिमेत पुणे आरटीओने गेल्या अकरा महिन्यांत एकूण १ हजार ४६४ शालेय वाहनांची तपासणी केली. त्यापैकी २४९ वाहने दोषी आढळली असून, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून २२ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.
जानेवारी ते नोव्हेंबर २०२५ या कालावधीत झालेल्या तपासणीचा आढावा घेत असताना आरटीओने काही गंभीर त्रुटी निदर्शनास आल्याचे सांगितले. वाहनांची फिटनेस तपासणी, सुरक्षा साधने, चालकांची पात्रता, सहायक कर्मचाऱ्यांची उपस्थिती, तसेच सीसीटीव्ही किंवा जीपीएस यांसारख्या अनिवार्य सुविधा अनेक वाहनांमध्ये अपूर्ण अवस्थेत असल्याचे आढळले. परिवहन विभाग आणि पोलिस विभागाच्या संयुक्त विद्यमाने लवकरच नियमित आणि विशेष तपासणी मोहीम हाती घेतली जाणार आहे. नियमांचे पालन न करणाऱ्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाईसोबतच पुढील वाहतूक परवान्यांवरही परिणाम होऊ शकतो, असा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, शाळांनी आयोजित शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थ्यांची वाहतूक सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष खबरदारी घेणे बंधनकारक आहे. सहलीतील वाहने वैध कागदपत्रांसह असणे आवश्यक असून, सहलीपूर्वी आरटीओ परमिट अनिवार्य असल्याचे सांगण्यात आले.
या नियमांचे पालन आवश्यक
- विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे अनिवार्य
- ६ वर्षांखालील मुलांच्या ने-आणीसाठी महिला कर्मचारी बंधनकारक
- मुली प्रवास करणाऱ्या शाळांमध्येही महिला कर्मचारी अनिवार्य
- वाहन चालक, कंडक्टर, मदतनीस यांची पोलिस चारित्र्य पडताळणी आवश्यक
- स्कूल बस चालकांची दरवर्षी नेत्र तपासणी अनिवार्य; प्रमाणपत्र नसल्यास विद्यार्थ्यांची वाहतूक मनाई
स्कूल बस नियमावलीचे पालन न करणाऱ्या बसेसची तपासणी मोहीम हाती घेण्यात आली असून, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाणार आहे. गेल्या वर्षभरातदेखील अनेक कारवाया झाल्या आहेत. त्या पुढेही सुरू राहतील. -स्वप्नील भोसले, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पुणे