रुपेश मारणे, बाब्या पवार अद्यापही फरार; पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 09:32 IST2025-10-14T09:31:38+5:302025-10-14T09:32:20+5:30
परिणामी, आता पोलिसांना रुपेश मारणे याच्या अटकेसाठी रोख बक्षीस जाहीर करण्याची वेळ आली आहे

रुपेश मारणे, बाब्या पवार अद्यापही फरार; पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या कामगिरीवर गंभीर प्रश्नचिन्ह
पुणे: शहरातील कुख्यात गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागत नसल्याने पोलिस यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सामान्य नागरिकांवर हल्ला केल्याच्या दोन वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये फरार असलेले मारणे टोळीतील रुपेश मारणे आणि बाब्या उर्फ श्रीकांत पवार हे दोघे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. चार वर्षांपूर्वी गोळीबार प्रकरणात मकोका अंतर्गत कारवाईनंतर फरार झालेला अजय शिंदेही अद्याप पकडला गेलेला नाही. त्यामुळे गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलीस नेमके करत काय आहेत, असा सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.
या वर्षी कोथरूड परिसरात टोळक्यांकडून सामान्य नागरिकांवर हल्ल्याच्या तब्बल तीन घटना घडल्या. त्यातील दोन घटनांमध्ये घायवळ टोळीचे गुंड पोलिसांच्या ताब्यात आले असले तरी, फेब्रुवारी महिन्यात तरुणावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी आरोपी रुपेश मारणे आणि बाब्या पवार हे दोघे फरार आहेत. हे दोघेही सराईत गुन्हेगार असून, गेल्या आठ महिन्यांपासून पोलिसांना चकवून पळ काढत आहेत.
गुन्हे शाखेकडून या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू असला तरी, अद्याप ठोस प्रगती झालेली नाही. परिणामी, पोलिसांना रुपेश मारणे याच्या अटकेसाठी रोख बक्षीस जाहीर करण्याची वेळ आली. दुसरीकडे, पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी गायवळ, टिपू पठाण आणि आंदेकर टोळींच्या आर्थिक नाड्या आवळण्याचा निर्णय घेत कारवाई सुरू केली आहे. मात्र, हीच कठोर भूमिका मारणे टोळीवरही घेतली जाणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
इंटेलिजन्स आणि नेटवर्क फेल?
रुपेश मारणे आणि बाब्या पवार या दोघांचा ठावठिकाणा लागत नसल्याने पोलिसांच्या इंटेलिजन्स यंत्रणा आणि तांत्रिक विश्लेषण क्षमतेवर शंका व्यक्त केली जात आहे. खबऱ्यांचे नेटवर्कही निष्प्रभ ठरत असल्याची चर्चा पोलिस वर्तुळातच सुरू आहे. त्यामुळे गुन्हे शाखेतील मनुष्यबळ, तपास पद्धती आणि समन्वय यांचा फेरआढावा घेण्याची वेळ आली आहे, अशी चर्चा गती धरत आहे."