नवले पूल परिसरात आरटीओने घेतले ‘झोपेचे सोंग’; ‘फिटनेस’ आणि ‘ओव्हरलोड’ तपासणी नाहीच
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2025 18:09 IST2025-11-18T18:08:23+5:302025-11-18T18:09:18+5:30
सर्व यंत्रणा एकमेकांवर ढकलत राहतील आणि आरटीओसारखे विभाग निवांत राहतील; पण पुणेकर मात्र या रस्त्यावर केवळ मृत्यूच्या भीतीने प्रवास करत राहतील

नवले पूल परिसरात आरटीओने घेतले ‘झोपेचे सोंग’; ‘फिटनेस’ आणि ‘ओव्हरलोड’ तपासणी नाहीच
धायरी : पुणे-बंगळुरु महामार्गावरील नऱ्हे येथील नवले पूल परिसरात अपघातांची मालिका सुरू असताना, प्रत्येक शासकीय विभाग दुसऱ्याकडे बोट दाखवून आपली जबाबदारी झटकत आहे. मात्र, या संपूर्ण गोंधळात एका यंत्रणेचा घोर आणि अक्षम्य निष्काळजीपणा स्पष्टपणे दिसून येत आहे, तो म्हणजे प्रादेशिक परिवहन कार्यालय.
जीवित आणि वित्तहानी होत असतानाही आरटीओ विभाग जणू काही ही समस्या आपली नाही, अशा आविर्भावात ‘निवांत’ असल्याचे धक्कादायक चित्र आहे. या महामार्गावरील अपघातांचे मूळ कारण असलेल्या नादुरुस्त आणि ओव्हरलोडेड वाहनांवर कारवाई करण्याची ज्याची मुख्य जबाबदारी आहे, तो विभाग मात्र मैदानातून पूर्णपणे गायब झाला आहे. नवले पुलाकडे येणाऱ्या अवजड वाहनांची तपासणी करण्यासाठी खेड-शिवापूर टोलनाका किंवा नवीन कात्रज बोगद्याच्या परिसरातील प्रवेशमार्ग ही अत्यंत महत्त्वाची ठिकाणे आहेत. या ठिकाणांवर ‘आरटीओ’च्या वतीने तपासणी नाका उभारणे अत्यावश्यक आहे.
मात्र, या महत्त्वाच्या ठिकाणी आरटीओचे तपासणी पथक शोधूनही सापडत नाही. त्यामुळे ब्रेक निकामी झालेले, फिटनेस नसलेले आणि क्षमतेपेक्षा अनेक पटींनी ओव्हरलोड केलेले हेवी लोडेड ट्रक बिनधास्तपणे तीव्र उतारावर प्रवेश करतात आणि अपघातांचे ‘यमदूत’ बनतात.
केवळ ‘परमिट’ आणि ‘पेनल्टी’साठी?
नवले पुलावरील अपघातांचे मुख्य कारण वाहनांचा फिटनेस नसणे आणि अतिभार हे असताना, आरटीओ अधिकारी डोळ्यांवर पट्टी बांधून आहेत का? या वाहनांची तपासणी केल्यास अवजड वाहनांच्या बेफिकीर वाहतुकीला तत्काळ आळा बसेल आणि अपघातांचे प्रमाण निश्चितच कमी होईल; पण आरटीओ विभाग ही साधी आणि प्रभावी उपाययोजना का करत नाही? त्यांना केवळ कागदोपत्री दंड आकारण्यात रस आहे की, रस्त्यावर प्रत्यक्ष काम करून जीव वाचवण्यात?
जनतेचा सवाल; आरटीओ आपली जबाबदारी कधी स्वीकारणार?
एका बाजूला प्रशासन वेगमर्यादा ३० किमी करण्याची घोषणा करत आहे आणि दंड आकारण्याची तयारी करत आहे; पण अपघाताचे मूळ कारण असलेल्या नादुरुस्त वाहनांना रस्त्यावर सोडण्याची जबाबदारी कोणाची? नवले पुलावर निर्दोष नागरिकांचा रक्तपात थांबवण्यासाठी आरटीओ विभागाला आणखी किती मोठ्या अपघाताची वाट पाहायची आहे? आरटीओने त्वरित आपली ‘आरामशीर’ भूमिका सोडून, खेड-शिवापूर आणि बोगद्याच्या परिसरात तातडीने तपासणी केंद्रे उभी करावीत आणि ओव्हरलोडेड वाहनांना महामार्गावर प्रवेश देण्यास कायमस्वरूपी मनाई करावी! अन्यथा, सर्व यंत्रणा एकमेकांवर ढकलत राहतील आणि आरटीओसारखे विभाग निवांत राहतील; पण पुणेकर मात्र या रस्त्यावर केवळ मृत्यूच्या भीतीने प्रवास करत राहतील!