२ महिन्यांच्या कांदा पिकावर नाईलाजाने रोटाव्हेटर फिरवला; अतिवृष्टी आणि खराब हवामानाचा दुहेरी फटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:05 IST2025-10-07T13:03:11+5:302025-10-07T13:05:33+5:30
शेतात उभे असलेले हिरवेगार पीक नष्ट करण्याची ही कृती शेतकऱ्याच्या मनातील वेदना आणि आर्थिक नुकसानीची दाहकता स्पष्टपणे दर्शवत आहे

२ महिन्यांच्या कांदा पिकावर नाईलाजाने रोटाव्हेटर फिरवला; अतिवृष्टी आणि खराब हवामानाचा दुहेरी फटका
शेलपिंपळगाव : शेतकऱ्यांना खराब हवामान (वातावरण) आणि अतिवृष्टी अशा नैसर्गिक संकटांचा दुहेरी फटका बसला आहे. या दोन कारणांमुळे शेतीत मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली असून दोन महिने कष्ट करून वाढवलेले कांदा पीक वाचवता न आल्याने करंदी (ता. शिरूर) येथील बळीराजाने हताश होऊन त्यावर थेट रोटाव्हेटर फिरवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. शेतात उभे असलेले हिरवेगार पीक नष्ट करण्याची ही कृती शेतकऱ्याच्या मनातील वेदना आणि आर्थिक नुकसानीची दाहकता स्पष्टपणे दर्शवत आहे.
साधारणपणे, कांद्याच्या चांगल्या वाढीसाठी कोरडे आणि मध्यम तापमान आवश्यक असते. मात्र, यंदा वातावरणात मोठा बदल दिसून आला आहे. कधी ढगाळ वातावरण, तर कधी वाढलेला अचानक पाऊस यामुळे कांदा पिकाच्या वाढीच्या टप्प्यावर विपरीत परिणाम झाला. हवामानातील लहरीपणामुळे पिकाची रोगप्रतिकारशक्ती कमी झाली. त्यातच, अतिवृष्टीने शेतात मोठ्या प्रमाणात पाणी साचून राहिले. जमिनीतील पाण्याचा निचरा न झाल्यामुळे कांद्याच्या मुळांना हवा मिळाली नाही आणि जमिनीत अतिरिक्त ओलावा टिकून राहिला. या दोन्ही कारणांमुळे पिकाची वाढ खुंटली. तसेच सातत्याने ओलावा टिकून राहिल्यामुळे आणि हवामान साथ देत नसल्यामुळे कांद्यावर करपा, मावा तसेच बुरशीजन्य रोगांचा मोठा प्रादुर्भाव झाला.
२ महिन्यांच्या कांदा पिकावर नाईलाजाने रोटाव्हेटर फिरवला; अतिवृष्टी आणि खराब हवामानाचा दुहेरी फटका#pune#shirur#farmer#rainpic.twitter.com/cdBSTspiOS
— Lokmat (@lokmat) October 7, 2025
कांद्याच्या पाती पिवळ्या पडणे, मान कुजणे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर दिसू लागले. दोन महिन्यांचे पीक असल्याने, यात गुंतवणूक केलेला संपूर्ण खर्च वाया गेला. पीक आता वाचवणे शक्य नाही, याची खात्री पटल्यानंतर, शेतकऱ्याने पुढील हंगामासाठी जमीन लवकरात लवकर मोकळी करण्यासाठी आणि रोगट पीक नष्ट करण्यासाठी नाईलाजाने ट्रॅक्टरच्या साहाय्याने त्यावर रोटाव्हेटर फिरवण्याचा कठोर निर्णय घेतला.
शासनाच्या तातडीच्या मदतीची मागणी...
केवळ दोन महिन्यांचे पीक डोळ्यांसमोर नष्ट होताना पाहणे हा शेतकऱ्यांसाठी केवळ आर्थिकच नाही, तर भावनिक आघात आहे. एकीकडे उत्पादन खर्च वाढत असताना, नैसर्गिक आपत्तीमुळे पीक नष्ट करण्याची वेळ बळीराजावर आली आहे. या गंभीर नुकसानीची दखल घेऊन, शासनाने लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून अतिवृष्टी आणि रोगराईने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने आणि भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.