कोयता दाखवून महिलांची लूट; तिसऱ्याच दिवशी कुख्यात गुंड लखन भोसलेचा पुण्यात एन्काऊंटर
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 17:35 IST2025-08-31T17:33:16+5:302025-08-31T17:35:40+5:30
एका महिलेला कोयत्याचा धाक दाखवून लुटल्यानंतर काही महिलांनी अक्षरशः गेटवरून उड्या मारल्याचा सीसीटीव्ही समोर आला होता

कोयता दाखवून महिलांची लूट; तिसऱ्याच दिवशी कुख्यात गुंड लखन भोसलेचा पुण्यात एन्काऊंटर
पुणे : लखन भोसले... साताऱ्यातल्या खटाव तालुक्यातला कुख्यात गुंड... या गुंडाचा सातारा पोलिसांनी शनिवारी सायंकाळी पुण्याजवळ खात्मा केला. सातारा पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्यात त्याला पकडण्यासाठी सातारा पोलीस पुणे जिल्ह्यातल्या शिक्रापूर गावात आले होते. मात्र लखन भोसले आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवरच चाकून हल्ला केला. आणि त्यानंतर पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये लखन भोसले ठार झाला.
लखन भोसले हा साताऱ्यातल्या खटाव तालुक्यातील जयराम स्वामी वडगाव येथील रहिवाशी आहे. लखन कुख्यात गुंड असून त्याच्यावर सातारा, सांगली, पुणे आणि इतर जिल्ह्यात घरफोडी आणि जबरी चोरीचे अनेक गुन्हे दाखल होते. यापूर्वी तो अनेकदा तुरुंगातही गेला होता. तर याच लखन भोसलेने गुरुवारी म्हणजेच 28 ऑगस्ट रोजी साताऱ्यात एक भयानक गुन्हा केला होता. रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेला त्याने रस्त्यावरच आडवे पाडून कोयत्याच धाक दाखवून अंगावरचे दागिने लुटले होते. या घटनेचा भयानक सीसीटीव्ही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. लखन भोसलेच्या दहशतीमुळे काही महिलांनी अक्षरशः गेटवरून उड्या मारल्याचा सीसीटीव्ही समोर आला होता. आणि त्यानंतर नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली होती. या घटनेनंतर लखन भोसले फरार झाला होता. सातारा पोलिसांचे पथक त्याच्या मागावर होतं.'
दरम्यान तपास पथकातील अधिकाऱ्यांना फरार असलेल्या लखन भोसलेचं लोकेशन पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर जवळ सापडलं. शुक्रवारी पहाटे सातारा पोलिसांचे पथक शिक्रापूर जवळ दाखल झालं. त्यांना लखन भोसले आणि त्याच्या साथीदारांचा सुगावा लागला होता. पोलीस त्याला पकडण्यासाठी गेले ही होते. पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र लखन भोसले आणि त्याच्या साथीदारांनी पोलिसांवरच हल्ला केला. हातातील चाकूने त्यांनी पोलिसांवर वार केले. यामध्ये काही पोलीस कर्मचारी जखमीही झाले. मात्र परिस्थिती नियंत्रणा बाहेर जाताच पोलिसांनी लखनच्या दिशेने गोळीबार केला. यामध्ये पाठीवर गोळी लागल्याने लखन भोसले जागीच कोसळला. त्यानंतर पोलिसांनी त्याला तातडीने नजीकच्या रुग्णालयात नेलं. मात्र डॉक्टरांनी त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केल्याचं पोलिसांनी सांगितलं.
लखन भोसले ठार झाला असला तरी त्याचा दुसरा साथीदार मात्र पळून जाण्यात यशस्वी ठरला. सातारा पोलिसांचं दुसरं पथक या पसार झालेल्या आरोपीच्या मागावर आहे. तर ठार झालेला आरोपी लखन भोसले हा अधिक दिवसांपासून पोलिसांसाठी डोकेदुखी ठरत होता. घरपुडी आणि जबरी सुरक्षा गुन्ह्यात तो यापूर्वी अनेकदा तुरुंगात जाऊन आला होता. मात्र तुरुंगातून बाहेर आल्यानंतर तो पुन्हा गुन्हे करायचा. याशिवाय सातारा परिसरात त्याची दहशतही होती. मात्र साताऱ्यातील त्याचा सोनसाखळी चोरीचा तो गुन्हा शेवटचा ठरला. कोयत्याच्या धाकाने त्याने महिलेच्या अंगावरील दागिने लुबाडले होते. आणि त्याचा सीसीटीव्ही व्हायरल झाल्यानंतर लखन भोसले विरुद्ध संताप आणखी वाढला. आणि त्यानंतर दोन दिवसात सातारा पोलिसांनी त्याचा एन्काऊंटर केला. या घटनेनंतर शिक्रापूर परिसरात एकच खळबळ उडाली होती.
दरम्यान लखन भोसलेच्या खातम्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांच्या या कारवाईचे स्वागत केलं. धोकादायक गुन्हेगार रस्त्यावर मोकाट फिरत असल्याने महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला होता. अशावेळी पोलिसांनी एन्काऊंटर करून योग्य कारवाई केली असल्याचे सांगत काही नागरिकांनी समाधान व्यक्त केलं. लखन भोसलेचा लुटीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकही काहीसे भीतीच्या सावटाखाली होते. मात्र त्यानंतर त्याच्या एन्काऊंटर च्या बातमीने सर्वसामान्य नागरिकांनी समाधान व्यक्त केलं.