पुणे : पुण्यात चोरटयांनी अक्षरशः निर्लज्जपणाची सीमा ओलांडली आहे. महिलांचे कपडे घालून एका कंपनीत चोरी केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. वानवडी परिसरातील या घटनेचा व्हिडिओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वानवडी परिसरातीलच एका कंपनीत घुसत या चोरटयांनी तांब्याचे वायर चोरले आहेत. कुणाला ओळखू येऊ नये म्हणून या चोरांनी महिलांचा वेश परिधान केले होते. मात्र हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्यानंतर पोलिसांनी या गुन्ह्याचा छडा लावला. वानवडी पोलिसांनी दोन भुरट्या चोरांना अटक केली आहे. हे चोरटे महिलांचे कपडे घालून कंपनीत चोरी करत होते. अमन अजीम शेख आणि मुसा अबू शेख या दोन चोरट्यांना अटक केली. त्यांच्या ताब्यातून 2 लाख 19 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
रात्री दोन वाजता या दोघांनी कंपनीत प्रवेश केला. त्यातील एकाने पिवळ्या रंगाचा गाऊन व दुसऱ्याने गुलाबी रंगाची सलवार कमीच घेतला होता. दोघांनी तोंडाला ओढणी व मास्क बांधला होता. दोघांनी हरको कंपनीचा खिडकीचा गज तोडून कंपनीत आत मध्ये प्रवेश केला. कंपनीच्या रूम मधील ठेवलेले 2,19,000/- रुपये किमतीचे तांब्याचे वायर व पट्टे असलेले रोल्स चोरले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.