आंबेगावात पिस्तूलचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडा; २ लाख लुटले, चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 09:47 IST2025-10-04T09:45:49+5:302025-10-04T09:47:27+5:30
पैसे काढून द्या नाहीतर तुम्हाला ठार करू असे म्हणून चोरट्यांनी टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले एक लाख 90 हजार 370 काढून घेऊन जबरी चोरी केली आहे

आंबेगावात पिस्तूलचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडा; २ लाख लुटले, चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद
मंचर: पिस्तूलचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर चौघांनी दरोडा टाकत एक लाख 90 हजार 370 रुपये चोरून नेले आहेत.पळून जाताना एका चोरट्याने पिस्तूलमधून हवेत गोळीबार केल्याने दहशत पसरली होती. ही घटना तांबडेमळा (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीतील ऋषी पेट्रोल पंपावर रात्री ९.३० वाजता घडली आहे .चोरीचा हा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
आंबेगावात पिस्तूलचा धाक दाखवून पेट्रोल पंपावर दरोडा; तब्बल १ लाख लुटले, चोरीचा थरार सीसीटीव्हीत कैद#Pune#ambegaon#THIEF#Police#crime#money#petrolpumppic.twitter.com/bBBe1rr2vC
— Lokmat (@lokmat) October 4, 2025
तांबडेमळा गावच्या हद्दीत ऋषी पेट्रोल पंप आहे. आज पहाटे तीनच्या सुमारास दुचाकीवरून आलेल्या चार चोरट्यांनी येथे दरोडा टाकला. पेट्रोल पंपावरील एक कर्मचारी ऑफिसमध्ये बसला होता तर दुसरा बाहेर होता. त्यावेळी हातात पिस्तूल घेतलेले दोन चोरटे आत आले. उर्वरित दोन चोरटे बाहेर लक्ष ठेवण्यासाठी उभे होते. आत आल्यावर चोरट्यांनी आतील कर्मचाऱ्यांवर पिस्तूल रोखले. बाहेरील कर्मचाऱ्याला आत नेले. पिस्तूलचा धाक दाखवून चोरट्यांनी कर्मचाऱ्यांकडे पैशाची मागणी केली. घाबरलेले कर्मचारी हात वर करून उभे राहिले. त्यावेळी त्यातील एका चोरट्याने ड्रॉवर उचकण्यास सुरुवात केली. यावेळी चोरटे त्यांना जीवे मारण्याची धमकी देत होते. पैसे काढून द्या नाहीतर तुम्हाला ठार करू असे म्हणून चोरट्यांनी टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेले एक लाख 90 हजार 370 काढून घेऊन जबरी चोरी केली आहे. चोरटे बराच वेळ आतमध्ये होते. चौघेही चोरटे एकाच मोटरसायकलवर आले होते. चोरी करून परत चालत जाताना दीडशे मीटर अंतरावर मोटरसायकलवर बसत असताना त्यातील एक चोरटा खाली पडला. आपल्याला पंपावरील कर्मचारी पकडतील या भीतीने त्यातील एका चोरट्याने हातातील पिस्तुलाने हवेत गोळीबार केला त्यामुळे कर्मचारी घाबरले गेले. चौघेही चोरटे मोटरसायकल वरून नाशिकच्या दिशेने फरार झाले आहेत. हा सर्व थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. विशेष म्हणजे यात चोरट्यांचे चेहरे स्पष्टपणे दिसून येत आहेत. पोलिसांना माहिती समजतात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तपासासाठी दाखल झाले आहे. श्वान पथकाने माग काढण्याचा प्रयत्न केला मात्र जिथे मोटरसायकल उभी केली होती तिथपर्यंत श्वान पोहोचले. ठसे तज्ञांनी नमुने घेतले आहेत. उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल मांडवे यांनी रात्री भेट दिली. दरम्यान तपासासाठी पोलीस पथके नेमण्यात आली असून ती रवाना झाली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चोरट्यांचा शोध घेत आहोत, महामार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत असे पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी सांगितले. पेट्रोल पंप चालकांनी सुरक्षेची काळजी घ्यावी. चांगले सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच पेट्रोल पंपावर लाईट मोठ्या प्रमाणात सुरू ठेवावी असे आवाहन कंकाळ यांनी केले आहे.