Red Alert: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड सोबतच पुण्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; पुढील ३-४ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 11:25 IST2025-08-19T11:25:17+5:302025-08-19T11:25:38+5:30

सोमवारपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. मात्र काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची संततधार सुरू होती. आज मात्र अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे.

Red alert on Mumbai, Thane, Palghar, Raigad and Pune Ghats; Warning of heavy rain for the next 3-4 hours | Red Alert: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड सोबतच पुण्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; पुढील ३-४ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

Red Alert: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड सोबतच पुण्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट; पुढील ३-४ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

पुणे: मुंबई, ठाणे, पालघर, रायगड सोबतच पुण्यातील घाटमाथ्यावर पुढील ३-४ तास अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने या भागात रेड अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन विभागाने केले आहे. पुण्यातही सकाळपासून पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे. शहरात अनेक भागात मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी झाली आहे. तसेच रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे.    

गेल्या तीन आठवड्यांपासून राज्यात पावसाची केवळ रिपरिप सुरू होती. मात्र, सोमवारपासून दमदार पावसाने हजेरी लावली आहे. काल सकाळपासून राज्यात अनेक भागात मुसळधार पावसाने सुरुवात झाली आहे. तर काही भागात हलक्या ते मध्यम पावसाची संततधार सुरू होती. आज मात्र अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर वाढताना दिसत आहे. शाळांना सुट्ट्याही जाहीर करण्यात आल्या आहेत. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मंगळवारीही (दि. १९) आकाश ढगाळ राहून मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली होती. 

सकाळपासून वाढला जोर

पावसाचा जोर सकाळपासूनच वाढला आहे. त्यामुळे सखल भागांत रस्त्यावर पाण्याचे तळे साचले आहे. काही प्रमुख मार्गांवर खड्डे पडल्याने वाहतूक संथ गतीने सुरू आहे. शिवाय सकाळपासूनच पावसाला सुरुवात झाल्याने अनेकांनी चारचाकी घेऊन बाहेर पडण्यास पसंती दिली. टिळक रस्ता, बाजीराव रस्ता, फर्ग्युसन रस्ता, जंगली महाराज रोड, तसेच मध्यवर्ती भागातील अप्पा बळवंत चाैक, नारायण पेठ, सदाशिव पेठ या भागात काही प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे. 

आज पाऊस

भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या अंदाजानुसार शहर व परिसरात मंगळवारीही आकाश समान्यत: ढगाळ राहून दिवसभर मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर घाट परिसरात खूप जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आहे. तुरळक ठिकाणी अत्यंत जोरदार पाऊस पडेल, अशी माहिती हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली आहे.

Web Title: Red alert on Mumbai, Thane, Palghar, Raigad and Pune Ghats; Warning of heavy rain for the next 3-4 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.