एसटी प्रवाशांची तहान भागवणे झाले महाग; ‘नाथजल’ गायब

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2026 17:06 IST2026-04-17T17:05:42+5:302026-04-17T17:06:07+5:30

-  अधिकृत उपाहारगृह थांब्यांवर पाच रुपयांची लूट; परिवहन विभागाचे दुर्लक्ष

Quenching the thirst of ST passengers has become expensive; 'Nathjal' disappears | एसटी प्रवाशांची तहान भागवणे झाले महाग; ‘नाथजल’ गायब

एसटी प्रवाशांची तहान भागवणे झाले महाग; ‘नाथजल’ गायब

पिंपरी : कडक उन्हाचा तडाखा बसत असतानाच, लांब पल्ल्याच्या एसटी बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता पाण्यासाठीही जादा पैसे मोजावे लागत आहेत. पुणे-बंगळुरू महामार्गावरील राज्य परिवहन मंडळाचे महामार्गावरील अधिकृत उपाहारगृह थांब्यांवर नाथजल मिळत नाही. त्यामुळे प्रवाशांना अधिक पैसे मोजावे लागत आहे.

पुणे-बंगळुरू महामार्गावरील खंबाटकी घाटाच्या सुरुवातीला आणि शिरवळ येथील एसटीच्या अधिकृत उपाहारगृह थांब्यांवर पाहणी केली. या दोन्ही महत्त्वाच्या थांब्यांवर राज्य परिवहन मंडळाने स्वस्त दरात उपलब्ध करून दिलेले ‘नाथजल’ कुठेही विक्रीसाठी उपलब्ध नसल्याचे आढळून आले. त्याऐवजी स्थानिक आणि खासगी कंपन्यांच्या पाण्याच्या बाटल्यांचा मोठा साठा तिथे पाहायला मिळाला.

पाच रुपयांचा अतिरिक्त ‘डोस’

नाथजलची किंमत शासकीय दरानुसार १५ रुपये आहे, तर खासगी ब्रॅण्डची किंमत २० रुपये आहे. नाथजल उपलब्ध नसल्याचे सांगून प्रवाशांना २० रुपयांची खासगी पाण्याची बाटली घेण्यास भाग पाडले जात आहे. प्रमुख बसस्थानकांवर किंमत १५ रुपये असताना प्रवाशांकडून सर्रास २० रुपये उकळले जात आहेत.

परिवहन विभागाचा कानाडोळा

एसटी महामंडळाने स्वतःचा ‘नाथजल’ ब्रॅण्ड सुरू करण्यामागे प्रवाशांना स्वस्त आणि शुद्ध पाणी मिळणे हा मुख्य उद्देश होता. मात्र, उपाहारगृह चालक आणि खासगी कंपन्यांच्या साट्यालोट्यामुळे हा उद्देश धुळीस मिळाला आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत दररोज हजारो प्रवासी या मार्गावरून प्रवास करतात. त्यांच्याकडून होणारी ही वसुली लाखो रुपयांच्या घरात असूनही परिवहन विभाग याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत.

Web Title : एसटी यात्रियों की प्यास बुझाना हुआ महंगा; 'नाथजल' गायब

Web Summary : एसटी बस यात्रियों को पानी के लिए अधिक कीमत चुकानी पड़ रही है क्योंकि राजमार्ग स्टॉप से ​​'नाथजल' गायब हो गया है। गर्मी में यात्रियों का शोषण करते हुए निजी ब्रांड ₹15 की जगह ₹20 में बेचे जा रहे हैं। परिवहन विभाग सस्ती पानी के उद्देश्य को कमजोर करते हुए, इस अधिक शुल्क को अनदेखा कर रहा है।

Web Title : ST Passengers Thirst Quenched Expensively; 'Nathjal' Disappears

Web Summary : ST bus travelers face inflated water prices as 'Nathjal' disappears from highway stops. Private brands are sold for ₹20 instead of ₹15, exploiting travelers during summer. The transport department seemingly ignores this overcharge, undermining the purpose of affordable water.