Pune: महिलांनी बसने सांभाळून प्रवास करावा; चोरट्यांचा सुळसुळाट, दागिने चोरीला
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 09:26 IST2024-12-09T09:26:19+5:302024-12-09T09:26:36+5:30
पीएमपी बसमध्ये घुसून महिलांच्या गळ्यातील दागिने, सोन्याच्या बांगड्या जातायेत चोरीला

Pune: महिलांनी बसने सांभाळून प्रवास करावा; चोरट्यांचा सुळसुळाट, दागिने चोरीला
पुणे : पीएमपी स्थानक परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. चोरट्यांनी वेगवेगळ्या घटनांत महिलांकडील अडीच लाख रुपयांचे दागिने चोरून नेले. स्वारगेट पीएमपी स्थानक, तसेच कात्रज परिसरात या घटना घडल्या.
स्वारगेट पीएमपी स्थानक परिसरात एका महिलेच्या गळ्यातील एक लाख १८ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेल्याची घटना घडली. याबाबत एका महिलेने स्वारगेट पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला चाकण भागात राहायला आहेत. त्या कामानिमित्त पुण्यात आल्या होत्या. शनिवारी (दि. ७) दुपारी एकच्या सुमारास त्या पीएमपी बसमध्ये प्रवेश करत होत्या. त्यावेळी चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील दागिने चोरून नेले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शैलेश आलाटे करत आहेत.
दुसऱ्या एका घटनेत कात्रज येथील पीएमपी बसथांब्यावर प्रवासी महिलेच्या हातातील एक लाख २० हजारांची सोन्याची बांगडी चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत महिलेने भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिला बसमध्ये प्रवेश करत हाेत्या. त्यावेळी चोरट्याने त्यांच्या हातातील बांगडी कटरचा वापर करून चोरली. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक नीलेश मोकाशी करत आहेत.