महिला व मुलींसाठी पुणे सुरक्षित हवे; सीसीटीव्हीसह यंत्रणा सज्ज करा, महापौरांचे पोलीस आयुक्तांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2026 10:09 IST2026-05-07T10:09:22+5:302026-05-07T10:09:31+5:30

सध्या अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याचे आढळून येत असून, त्यांची तत्काळ दुरुस्ती करून ते कार्यान्वित करण्यात यावेत.

Pune should be safe for women and girls Prepare a system including CCTV, Mayor's letter to Police Commissioner | महिला व मुलींसाठी पुणे सुरक्षित हवे; सीसीटीव्हीसह यंत्रणा सज्ज करा, महापौरांचे पोलीस आयुक्तांना पत्र

महिला व मुलींसाठी पुणे सुरक्षित हवे; सीसीटीव्हीसह यंत्रणा सज्ज करा, महापौरांचे पोलीस आयुक्तांना पत्र

पुणे: शहर व परिसरात झालेल्या अत्याचारांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसीटीव्ही व इतर यंत्रणा सज्ज करा. महिला व मुलींसाठी पुणे सुरक्षित झाले पाहिजे, असे पत्र महापौर मंजूषा नागपुरे यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले आहे.

अलीकडेच नसरापूर व पर्वती परिसरात घडलेल्या लहान बालकांवरील अत्याचार व हत्येसारख्या अत्यंत गंभीर घटनांच्या पार्श्वभूमीवर शहरातील नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याअनुषंगाने महापौर मंजूषा नागपुरे यांनी पुणे शहर पोलिस आयुक्तांना पत्र देऊन तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा पूर्णतः कार्यक्षम असणे अत्यावश्यक आहे. सध्या अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे नादुरुस्त असल्याचे आढळून येत असून, त्यांची तत्काळ दुरुस्ती करून ते कार्यान्वित करण्यात यावेत.

पोलिसांनी शहरातील सोसायट्या, व्यावसायिक आस्थापना व सार्वजनिक ठिकाणी कार्यरत असलेल्या सुरक्षा कर्मचाऱ्यांची योग्य ती पडताळणी सक्तीने करावी. नागरिकांनीही आपल्या परिसरात सतर्क राहणे अत्यंत महत्त्वाचे आहे. शेजारी राहणाऱ्या व्यक्तींची माहिती, नवीन भाडेकरूंची नोंद, संशयास्पद हालचाली याबाबत स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क ठेवण्याबाबत जनजागृती मोहीम राबविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे.

महापौरांनी पुढील प्रमुख मागण्या केल्या आहेत 

* शहरातील सर्व सीसीटीव्ही यंत्रणांचा आढावा घेऊन त्या तातडीने कार्यान्वित कराव्यात.
* सर्व सुरक्षा कर्मचाऱ्यांची सक्तीने पडताळणी व नोंदणी प्रक्रिया राबवावी.
* पार्श्वभूमी तपासणीशिवाय कोणालाही सुरक्षा कर्मचारी म्हणून नेमणूक देऊ नये.
* नागरिकांमध्ये सुरक्षाविषयक जनजागृती मोहीम राबवावी.

Web Title: Pune should be safe for women and girls Prepare a system including CCTV, Mayor's letter to Police Commissioner