Varandha Ghat : वरंधा घाटातून ३० सप्टेंबरपर्यंत वाहतुकीवर निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2025 19:07 IST2025-08-21T19:07:06+5:302025-08-21T19:07:14+5:30
भोर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे वरंधा घाट परिसरात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत

Varandha Ghat : वरंधा घाटातून ३० सप्टेंबरपर्यंत वाहतुकीवर निर्बंध
भोर : भोर तालुक्यात सततच्या मुसळधार पावसामुळे भोर-महाड रस्त्यावरील वरंधा घाटात बुधवारी पहाटे दरड कोसळण्याची घटना घडली. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांनी वरंधा घाटाची पाहणी केली. यावेळी त्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत अवजड वाहनांसाठी घाट पूर्णपणे बंद ठेवण्याचे, तसेच रेड आणि ऑरेंज अलर्टच्या काळात हलक्या वाहनांनाही बंदी घालण्याचे निर्देश प्रशासनाला दिले.
भोर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. या पावसामुळे वरंधा घाट परिसरात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत आहेत. यामुळे कोणतीही दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलली आहेत. बुधवारी महाड हद्दीत कोसळलेल्या दरडीच्या पार्श्वभूमीवर भोर प्रशासनाने वरंधा घाटातील भोर हद्दीतील रस्ते, दरडी आणि संरक्षक भिंतींची पाहणी केली. यावेळी घाट परिसरातील नागरिक आणि हॉटेल व्यावसायिकांना सतर्क राहण्यासह प्रशासनाशी संपर्कात राहण्याच्या सूचना प्रांताधिकारी डॉ. खरात यांनी दिल्या.
पाहणीदरम्यान निगुडघर मंडलाधिकारी रूपाली गायकवाड, ग्राम महसूल अधिकारी पल्लवी नांदे, अमीर शेख, आशिंपी उंबर्डेचे सरपंच प्रकाश उंब्राटकर, ग्रामपंचायत अधिकारी सुहास गायकवाड आणि ग्राम महसूल सेवक बबन अंबिके उपस्थित होते.