मान्सूनचा पहिलाच दिवस ओलाचिंब, दिवसभरात शहरात २१.६ मिलिमीटर पाऊस
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 08:52 IST2025-05-27T08:51:50+5:302025-05-27T08:52:56+5:30
- शहरातील आगमनाचा नवा विक्रम; मॉन्सून यंदा तब्बल १५ दिवस आधीच झाला दाखल

मान्सूनचा पहिलाच दिवस ओलाचिंब, दिवसभरात शहरात २१.६ मिलिमीटर पाऊस
पुणे : मान्सूनच्या आगमनाचा पहिलाच दिवस शहरात ढगाळ वातावरणाचा होता, तर तब्बल चार दिवसांनंतर शहरात सोमवारी (दि. २६) सूर्यदर्शन झाले. त्यामुळे पुणेकरांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र, काही काळानंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली. शहरात दिवसभर ढगाळ वातावरण होते. काही भागांत रिपरिप, तर काही भागांत मध्यम स्वरूपाच्या पावसाने पुणेकरांची तारांबळ उडाली. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार शहरात रात्री साडेपाचपर्यंत २१.६ मिलिमीटर पाऊस झाला होता. शहरात सर्वाधिक पाऊस वडगाव शेरी येथे ४१.५ मिलिमीटर नोंदविण्यात आला.
शहरात गेले चार दिवस सूर्यदर्शन झालेच नाही. पूर्व मोसमी पावसाने शहरात ढगाळ वातावरण कायम होते. मात्र, सोमवारी मान्सूनने शहरात आगमन केल्याची वार्ता भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिली. त्यामुळे मान्सूनचा पहिलाच दिवस शहरात पावसाचा दिवस ठरला. सकाळी काही काळ सूर्यदर्शन झाले. त्यामुळे काहीसा दिलासा जरूर मिळाला. मात्र, त्यानंतर दिवसभर वातावरण ढगाळ होते. दुपारनंतर पावसाला सुरुवात झाली. काही भागांत मध्यम स्वरूपाचा, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला.
सायंकाळी साडेपाचपर्यंत वडगाव शेरीमध्ये ४१.५, तर पाषाणमध्ये ३७.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. शिवाजीनगरमध्ये २१.६ मिलिमीटर पाऊस पडला. शहराच्या पूर्व भागात अर्थात हडपसरमध्ये १२.५ मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आला. पुढील दोन दिवस पुणे शहरात ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आहे. शहरासाठी विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, अशी माहिती भारतीय हवामानशास्त्र विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. डी. सानप यांनी दिली.
सायंकाळी साडेपाचपर्यंत झालेला पाऊस
शिवाजीनगर २१.६
पाषाण ३७.२
लोहगाव २८.८
हडपसर १२.५
मगरपट्टा १४.५
कोरेगाव पार्क २.५
एनडीए १.५
चिंचवड २०.५