पुणे : सध्या महाराष्ट्रावर आसमानी संकट घोंगावतय. वादळी पाऊस आणि गारपिटीनं काही ठिकाणी थैमान घातल्याचं चित्र आहे. पुणे शहरासहित जिल्ह्यातही अचानक आलेल्या अवकाळीनं कहर केला आहे. त्यामध्ये शेती आणि घरांचं मोठं नुकसान झाल्याचे चित्र समोर आले आहे. शहरात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप आले आहे. पुणेकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. तर ग्रामीण भागात अवकाळी गारपीट आणि वादळी पावसाने जनजीवन विस्कळीत झालं. शेतकरी आणि ग्रामस्थांचं नुकसान झालं. अनेक घरांचे छप्पर उडाल्याने सामान्य नागरिकांचे संसार उघड्यावर आलेमी आहेत. यामध्ये गावातील छतावरील पत्रे आणि कौल उडून गेले.
तीन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसाने खूपच नुकसान झाले आहे. काही घरांच्या भिंती कोसळल्यामुळे नागरिकांना मोठा फटका बसला. या संपूर्ण घटनेत सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला. भर पावसात आणि गारपिटीने काढणीला आलेला गहू, कांदा, ज्वारी यासारख्या रब्बी हंगामातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले. आंबा बागांनाही अवकाळीचा मोठा फटका बसलाय. त्यामुळे बागायतदार शेतकरी हवालदिल झालाय. शेतीच्या झालेल्या शेतकऱ्यांच्या आर्थिक गणिताची जुळवाजुळव कोलमडली आहे. तर जनावरांसाठी साठवलेला चारा भिजल्याने जनावरांच्या चार्याचा प्रश्न निर्माण झालाय. वादळी वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की अनेक ठिकाणी विद्युत तारा तुटल्याने व खांब पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला.
पुणे शहर, जिल्ह्यासह बारामती, आंबेगाव, दौंड तालुक्यांसह बहुतांश भागात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत अनेक ठिकाणी गारपीट झाली. अचानक कोसळलेल्या पावसामुळे उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, हातातोंडाशी आलेल्या पालेभाज्या जमीनदोस्त झाल्या आहेत. काही भागांत शेतात पावसाचे तळे साचले तर रस्ते, ओढे-नाले पाण्याने भरून वाहताना दिसले.
पुण्यातील रस्त्यांवर गुडघाभर पाणी
शहराच्या मध्यवर्ती भागात अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहू लागले आहेत. काही भागात झाडांच्या फांद्या कोसळल्या आहेत. नागरिकांनी घराबाहेर सध्या तरी पडू नये असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. रस्त्यावरून गाड्या वाहून जाताना दिसत आहेत. आपल्या वाहनांची खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.
ग्रामीण भागात मोठे नुकसान
गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा जोर वाढला असून, बुधवारी सायंकाळी अनेक ठिकाणी गारपीटसह पावसाने दमदार हजेरी लावली. बारामती तालुक्यातील धुमाळवाडी, पवईमाळ, आदी भागांमध्ये झालेल्या गारपीट आणि पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. केळी, आंबा, ऊस, चारा पिके, तसेच पालेभाज्या यांसारखी हातातोंडाशी आलेली पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली. गारांच्या माऱ्यामुळे झाडांची पाने गळून पडली असून, फळबागांनाही मोठा फटका बसला आहे.
शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू
शिवारात उभे असलेले हिरवेगार पीक क्षणांत सपाट झाल्याचे चित्र पाहून अनेक शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू दाटून आले. वर्षभराच्या कष्टाचे स्वप्न डोळ्यांसमोर उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी भावुक झाले. उत्पादन खर्चाच्या तुलनेत योग्य भाव मिळत नसतानाच अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांची आर्थिक कोंडी अधिकच वाढली आहे.
Web Summary : Unseasonal storms and hailstorms wreak havoc in Pune, disrupting life and devastating crops. Roads are flooded, homes damaged, and farmers face huge losses as standing crops are destroyed. Power outages add to the misery.
Web Summary : पुणे में बेमौसम तूफान और ओलावृष्टि से तबाही, जीवन अस्त-व्यस्त और फसलें बर्बाद। सड़कें जलमग्न, घर क्षतिग्रस्त, खड़ी फसलें नष्ट होने से किसानों को भारी नुकसान। बिजली गुल होने से परेशानी बढ़ी।