नीलेश घायवळच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी ईडीला पुणे पोलिसांकडून पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:04 IST2025-11-11T13:03:52+5:302025-11-11T13:04:21+5:30
घायवळविरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्यातून त्याने कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमवल्याचा संशय आहे

नीलेश घायवळच्या आर्थिक व्यवहारांच्या चौकशीसाठी ईडीला पुणे पोलिसांकडून पत्र
पुणे: टोळीप्रमुख नीलेश घायवळ याच्या आर्थिक व्यवहारांचा तपास करण्यासाठी पुणेपोलिसांच्या गुन्हे शाखेकडून अंमलजावणी संचालनालयाला (ईडी) पत्र पाठवून विनंती करण्यात आली आहे. घायवळविरोधात अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद असून, त्यातून त्याने कोट्यवधी रुपयांची संपत्ती कमवल्याचा संशय आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, नीलेश घायवळ आणि त्याच्या टोळीविरोधात एकूण ११ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये खंडणी, गुन्हेगारी कट, फसवणूक, बनावट कागदपत्रे तयार करणे, खुनाचा प्रयत्न आणि मालमत्ता बळकावण्यासाठी दुखापत करणे, अशा गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे. तपासादरम्यान पोलिसांना घायवळच्या मोठ्या आर्थिक उलाढालीचे पुरावे मिळाले आहेत. त्याने आणि त्याच्या सहकाऱ्यांनी धाराशिव, अहिल्यानगर, बीड, सातारा आणि परिसरात विंड पॉवर प्रकल्पांशी संबंधित गैरव्यवहार, खंडणी आणि बेकायदेशीर व्यवहारांद्वारे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
यासंदर्भातील एफआयआर आणि पुरावे ईडीकडे पाठवण्यात आले असून, तपासादरम्यान मनी लाँड्रिंगचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, घायवळने बेकायदेशीर मार्गाने पासपोर्ट मिळवल्याचेही समोर आले असून, तो सध्या परदेशात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कोथरूड मारहाण प्रकरणानंतर घायवळ टोळी पोलिसांच्या रडारावर आहे. तो सध्या परदेशात आहे. परंतु त्याने केलेल्या गंभीर गुन्ह्यांचा पोलिसांकडून तपास सुरु आहे. त्यामध्ये अनेक खुलासे होऊ लागले आहेत. त्याने पुणे जिल्ह्यातून अनेक गैरव्यवहार करत बेनामी कोट्यवधी संपत्ती मिळवली आहे. त्यामुळे पोलिसांनी आता थेट ईडीला पत्र पाठवून आर्थिक व्यवहाराच्या तपासणीच्या चौकशीची विनंती केली आहे.